मेलबर्न : क्रिकेटमध्ये १०० रन केल्यावर प्रत्येक खेळाडूचं शतक होतं. पण न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन याला अपवाद ठरली आहे. महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये सोफी डिव्हाईननं ११५ रन केले, पण तरी तिचं शतक मात्र हुकलं आहे. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण ऍडलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हुरिकेन्समध्ये झालेल्या या मॅचमध्ये हे पाहायला मिळालं आहे. ऑस्ट्रेलियातली स्थानिक टी-२० स्पर्धा असलेल्या बिग बॅश लीगमध्ये हा अनोखा रेकॉर्ड झाला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍडलेड स्ट्रायकर्स आणि होबार्ट हुरिकेन्समध्ये झालेली ही मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली. सोफी डिव्हाईननं या मॅचमध्ये नाबाद ९९ रन केले, तर सुपर ओव्हरमध्ये तिला नाबाद १६ रन करता आल्या. अशाप्रकारे मॅचमध्ये ११५ रन करूनही तिला शतक साजरं करता आलं नाही. 


या मॅचमध्ये होबार्ट हरिकेन्सनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. यानंतर ऍडलेडच्या सोफी डिव्हाईननं ५३ बॉलमध्ये ९९ रनची खेळी केली. होबार्टच्या हिथर नाईटनं टाकलेल्या शेवटच्या ओव्हरमध्ये सोफीनं तब्बल २२ रन काढले. सोफीच्या या खेळीमध्ये १० फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. सोफीच्या या खेळीमुळे ऍडलेडला १८९/५ एवढा स्कोअर करता आला. इनिंगची संथ सुरुवात करणाऱ्या सोफीला तहिला मॅक्ग्राथनं चांगली साथ दिली. तहिलानं ४२ बॉलमध्ये ६३ रन केले.



ऍडलेडनं ठेवलेल्या १९० रनचा पाठलाग करताना हुरिकेन्सकडून भारताच्या स्मृती मंधानानं जोरदार फटकेबाजी केली. स्मृतीनं २३ बॉलमध्ये तिचं अर्धशतक पूर्ण केलं. याआधी याच मोसमात स्मृतीनं २४ बॉलमध्ये अर्धशतक केलं होतं. बिग बॅश लीगमध्ये सगळ्यात जलद अर्धशतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आता स्मृती दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे.



स्मृती मंधानाबरोबरच जॉर्जीआ रेडमायनीनं ३७ बॉलमध्ये ५४ रन केले. पण होबार्ट हुरिकेन्सला हा सामना टाय करण्यात यश आलं. मॅच टाय झाल्यामुळे सुपर ओव्हर घेण्यात आली. सुपर ओव्हरमध्ये स्मृती मंधनानं सिक्स मारून हुरिकेन्सला १२/१ पर्यंत पोहोचवलं. यानंतर पुन्हा एकदा सोफी बॅटिंगला आली आणि तिनं ३ बॉलमध्येच १६ रन करून ऍडलेडला मॅच जिंकवून दिली.


आयसीसीनं नुकतीच २०१८ या वर्षाच्या सर्वोत्तम महिला टीमची घोषणा केली. या टीममध्येही न्यूझीलंडची सोफी डिव्हाईनचा समावेश होता. बिग बॅश लीगमध्ये सोफीनं आत्तापर्यंत १० मॅचमध्ये ४४९ रन केले आहेत. बीबीएलच्या या मोसमात सर्वाधिक रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सोफी दुसऱ्या क्रमांकावर आहे. याआधी मेलबर्न स्टार्सविरुद्धच्या मॅचमध्ये सोफीनं ९५ रन केले आणि ५ विकेटही घेतल्या. अशी कामगिरी करणारी सोफी ही महिला बीबीएलमधली पहिली खेळाडू ठरली.