टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर, भारतीय चाहत्यांची निराशा
२०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे.
मुंबई : २०२० साली ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. आयसीसीनं मंगळवारी महिला आणि पुरुष टी-२० वर्ल्ड कपचं संपूर्ण वेळापत्रक प्रसिद्ध केलं. हे दोन्ही वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियामध्ये खेळवले जातील. भारतीय क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपमध्ये नेहमीच भारत-पाकिस्तान मुकाबल्याची प्रतीक्षा असते. पण महिला आणि पुरुषांच्या वर्ल्ड कपचं वेळापत्रक पाहिलं तर भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे कदाचित २०२० सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान सामना बघायला मिळणार नाही.
महिला टी-२० वर्ल्ड कप २१ फेब्रुवारी ते ८ मार्चपर्यंत खेळवण्यात येईल. यामध्ये १० टीम सहभागी होतील. यामध्ये २ टीम क्वालिफायर असतील. या टीमना दोन ग्रुपमध्ये टाकण्यात आलं आहे. ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका आणि एक क्वालिफायर टीम असेल. तर ग्रुप बी मध्ये पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, इंग्लंड आणि क्वालिफायर टीम असेल.
पुरुषांचा टी-२० वर्ल्ड कप १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यंत खेळवला जाईल. यामध्ये एकूण १६ टीम सहभागी होतील. यातल्या ८ टीम क्वालिफायरमधून येतील, तर ८ टीमना थेट प्रवेश देण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्टइंडिज, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान या टीमना थेट प्रवेश मिळाला आहे. तर श्रीलंका, झिम्बाब्वे आणि इतर सहा टीमना क्वालिफायर राऊंड खेळावा लागणार आहे. ४ क्वालिफायर टीमना सुपर-१२ मध्ये जागा मिळेल. यामध्ये भारतासह ८ टीम आधीच आहेत. या सगळ्या टीमना सुपर-१२ च्या दोन ग्रुपमध्ये वाटण्यात आलंय.
भारताचा समावेश ग्रुप बी मध्ये आहे. यामध्ये इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, अफगाणिस्तान आणि दोन क्वालिफायर टीम असतील. तर ग्रुप ए मध्ये ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि क्वालिफायरच्या २ टीम असतील.
पुरुष आणि महिलांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तानचा सामना दोन्ही टीम सेमी फायनलमध्ये पोहोचल्या तर होऊ शकतो. सेमीफायनलमध्ये दोन्ही टीम वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांशी खेळल्या आणि जिंकल्या तर मात्र भारत-पाकिस्तानमध्ये फायनल होईल. जर दोघांपैकी एकही टीम ग्रुप स्टेजमध्येच बाहेर पडली तर प्रेक्षकांना या मुकाबल्याला मुकावं लागू शकतं.
पुरुषांच्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच २४ ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. या वर्ल्ड कपची सेमी फायनल ११ आणि १२ नोव्हेंबरला ऍडलेड ओव्हलमध्ये आणि फायनल १५ नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये होईल. महिला टी-२० वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २१ फेब्रुवारीला होणार आहे.
भारताच्या पुरुष टीमचं वेळापत्रक
२४ ऑक्टोबर- भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
२९ ऑक्टोबर- भारत विरुद्ध ए-२
१ नोव्हेंबर- भारत विरुद्ध इंग्लंड
५ नोव्हेंबर- भारत विरुद्ध बी-१
८ नोव्हेंबर- भारत विरुद्ध अफगाणिस्तान
भारताच्या महिला टीमचं वेळापत्रक
२१ फेब्रुवारी- भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
२४ फेब्रुवारी- भारत विरुद्ध क्वालिफायर-१
२७ फेब्रुवारी- भारत विरुद्ध न्यूझीलंड
२९ फेब्रुवारी- भारत विरुद्ध श्रीलंका