रणजी नाय तर IPL नाय! खेळाडूंना अद्दल घडवण्यासाठी BCCI चा तडकाफडकी निर्णय
BCCI On Ranji Trophy : गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलंय.
Ranji Trophy mandatory : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय (BCCI) आणि राष्ट्रीय निवड समितीनं खेळाडूंना शिस्त लावण्याच्या दृष्टीकोनातून कठोर पावल्याचं पहायला मिळतंय. जे खेळाडू राष्ट्रीय संघात खेळत नाहीत त्यांनी रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) खेळावी, असे सक्त निर्देश बीसीसीआयने खेळाडूंना दिल्याची माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर खेळाडूंच्या अरेरावीला आळा घालण्यासाठी बीसीसीआयने तडकाफडकी निर्णय घेतल्याचं देखील कळतंय. नॅशनल टीममध्ये जे खेळाडू खेळत नाहीत त्यांनी कमीतकमी 3 ते 4 सामने खेळण्याची सक्ती बीसीसीआयने (Ranji Trophy is mandatory) केली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून टीम इंडियाकडून खेळणाऱ्या अनेक खेळाडूंकडून रणजी क्रिकेटकडे कानाडोळा होत असल्याचं बीसीसीआयच्या पाहण्यात आलं होतं. तर आयपीएल तोंडावर असताना काही खेळाडूंनी रणजी ट्रॉफीमध्ये सहभाग नोंदवला नाही. जखमी होण्याच्या भीतीपोटी अनेक खेळाडूंनी रणजी न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यावर चाप बसवण्यासाठीच बीसीसीआयनं हा कठोर निर्णय घेतल्याचं सांगितलं जातंय. पीटीआयने याबाबत वृत्त दिलंय. बीसीसीआयने याबाबत अधिकृतरित्या माहिती दिली नाही.
बीसीसीआय अधिकाऱ्यांना माहित आहे, काही खेळाडूंना मुद्दामहून रेड बॉल क्रिकेट खेळत नाहीत. देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंनी उपलब्ध राहिलं पाहिजे. राज्य संघांसोबतच्या त्यांच्या वचनबद्धतेचा आदर करावा लागेल. नॅशनल टीम सिलेक्ट करताना यावर देखील भर दिला जाईल, असंही बीसीसीआय अधिकाऱ्यांनी पीटीआयला सांगितलं आहे. एवढंच नाही तर, टाळाटाळ करणारे खेळाडू आयपीएल खेळू शकणार नाहीत किंवा त्यांच्या फ्रँचायझीने सोडल्यास आयपीएल लिलावात देखील हजर राहता येणार नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
दरम्यान, इशान किशन, कृणाल पांड्या, दीपक चाहर यांसारखे खेळाडू राष्ट्रीय संघात नसून देखील रणजी ट्रॉफी खेळत नाहीत. तर हार्दिक पांड्या आणि श्रेयस अय्यर देखील येत्या काही दिवसात रणजी सामन्यात खेळतील का? असा सवाल विचारला जात आहे. सचिन तेंडूलकर, युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीने देखील नाव कमावल्यानंतर रणजी ट्रॉफीमध्ये फलंदाजी केलीये. त्यामुळे बीसीसीआय कोणालाही सुट्टी देणार नाही, हे नक्की...!