Paralympics Gold Medalist Navdeep Singh : पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताला भालाफेकीत सुवर्णपदक जिंकवून देणारा कमी उंचीचा भालाफेकपटू नवदीप सिंह सध्या बराच चर्चेत आहे. पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकच्या फायनल राउंडमध्ये नवदीप सिंहने 46.32 मीटर भाला फेकला. नवदीपने हा थ्रो केल्यावर अग्रेसिव्ह सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्याचे सेलिब्रेशन पाहून अनेकांना विराट कोहली आठवला, ज्यामुळे त्याला नेटकऱ्यांनी पॅरालिम्पिकमधला विराट कोहली असे देखील म्हटले. मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नवदीपने तो विराट किंवा धोनी नाही तर भारताच्या एका वेगळ्याच स्टार क्रिकेटरचा जबरा फॅन असल्याचे सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये भारतीय खेळाडूंनी उत्तम कामगिरी करून 29 पदक जिंकली. ज्यात 7 सुवर्ण, 9 रौप्य आणि 13 कांस्य पदकांचा समावेश होता. पॅरालिम्पिक पदकांच्या क्रमवारीत भारताने 18 व्या क्रमांकाचे स्थान पटकावले. भारताने जिंकलेल्या 7 सुवर्ण पदकांमध्ये नवदीप सिंहच्या पदकाचा सुद्धा समावेश होता. नवदीप भारतात परतल्यावर त्याचे जंगी स्वागत करण्यात आले. सुवर्णपदक विजेत्या नवदीपला एका प्रसिद्ध युट्यूब पॉडकास्टमध्ये मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. यावेळी त्याच्या आतापर्यंतच्या प्रवासाविषयी अनेक प्रश्न विचारण्यात आले. 


कोण आहे नवदीपचा आवडता क्रिकेटर?


नवदीपच्या व्हायरल व्हिडीओनंतर त्याला अनेकजण पॅरालिम्पिकमधला विराट कोहली असं म्हणत होते. तेव्हा मुलाखतकाराने प्रश्न विचारला की, 'नवदीप तू धोनीचा फॅन आहेस की विराटचा? यावेळी नवदीप म्हणाला, 'रोहित शर्मा'. त्याच्या या उत्तराने सर्वच आश्चर्यचकित झाले. मुलाखतकाराने विचारले रोहित शर्माच का? यावर नवदीप म्हणाला, 'तो खूप चांगला खेळतो. त्याने जेव्हा डबल सेंच्युरी मारली होती तेव्हा काय खेळले होते सर ते. तेव्हापासून मी त्यांचा फॅन आहे. मला तो खूप आवडतो'. 


मुलाखतकाराने नवदीपला विचारले, 'तुला तर अनेक लोक विराट कोहलीशी कम्पेअर करतायत. कोणी तुला विराट कोहली 2.0 म्हणतायंत तर कोणी तुला विराट कोहलीचा छोटा भाऊ म्हणतय". यावर तो म्हणाला, 'विराट कोहली चांगला खेळाडू आहे पण मला जो क्रिकेटर आवडतो तर आवडतो.'  



नवदीपने मोदींना घातली कॅप :


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन केले. यावेळी  भालाफेकपटू नवदीप सिंहने मोदींना कॅप (टोपी) घालण्याची इच्छा व्यक्त केली. मोदींनी नवदीपच्या इच्छेखातर त्या कॅपचा स्वीकार केला. पंतप्रधान मोदी नवदीपकडून कॅप घालून घेण्यासाठी जमिनीवर बसले. यानंतर मोदींनी नवदीपची फिरकी घेतली. मोदींनी विचारले, 'भालाफेकल्यावर तुला एवढा राग का येतो?' तेव्हा नवदीप म्हणाला, 'सर गेल्यावेळेस माझा चौथा क्रमांक आला होता त्यामुळे पदक मिळवण्यापासून चुकलो, पण आता ते मिळवलं याचा आनंद होता. तुम्हाला सुद्धा वचन देऊन गेलो होतो आणि ते पूर्ण केलं'. आता बाकी लोक काय म्हणतात असं मोदींनी विचारल्यावर तो म्हणाला, 'सर्व चांगलंच बोलतायत. देशाचं नाव मोठं केलं म्हणून'.