हैदराबाद : पाठीच्या दुखापतीमुळे टीम इंडियाचा ऑलराऊंडर वर्ल्ड कपनंतर खेळला नाही. हार्दिक पांड्याऐवजी आता शिवम दुबेला टीममध्ये जागा देण्यात आली आहे. बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजनंतर आता वेस्ट इंडिजविरुद्धही शिवमची टीममध्ये निवड झाली आहे. मी टीममध्ये हार्दिक पांड्याची जागा घेण्यासाठी आलो नाही, तर संधीचं सोनं करण्यासाठी आलो आहे, असं शिवम दुबेने स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या ३ टी-२० मॅचच्या सीरिजला शुक्रवार ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. शिवम दुबेने आतापर्यंत ३ टी-२० मॅच खेळल्या आहेत. या सगळ्या मॅच बांगलादेशविरुद्ध होत्या. ३० रन देऊन ३ विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


'मला संधी मिळाली आहे आणि मी देशासाठी शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. मला देशासाठी काम करायचं आहे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. ही हार्दिक पांड्याला हटवण्याची संधी नाही,' असं शिवम दुबे म्हणाला आहे.


'विराट आणि टीम प्रशासन माझा आत्मविश्वास वाढवत आहे. त्यांच्याकडून खूप मदत मिळत आहे. यामुळे मला ड्रेसिंग रूममध्ये अजिबात तणाव येत नाही,' असं शिवमने सांगितलं.


'ऑलराऊंडर असणं कायमच कठीण असतं. तुमचा फिटनेस तसाच ठेवणं आव्हान असतं, कारण तुम्हाला बॅटिंग आणि बॉलिंगही करायची असते,' असं वक्तव्य शिवम दुबेने केलं.


वेस्ट इंडिजविरुद्धची सीरिज सोपी असणार नाही, कारण ती एक चांगली टी-२० टीम आहे. आम्हीही चांगली तरायरी केली आहे, त्यामुळे आम्ही सीरिज जिंकू, असा विश्वास शिवम दुबेने व्यक्त केला.