ODI World Cup 2023 Scored Century After Dropped From Team: एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेची सुरुवात ऑक्टोबर महिन्यामध्ये होत आहे. 5 ऑक्टोबरपासून भारतामध्ये एकदिवसीय क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा सुरु होणार आहे. सर्वच संघांनी यासाठी तयारी सुरु केली आहे. विद्यमान विजेता असलेल्या इंग्लंडचा संघही जेतेपद कायम राखण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार असून इंग्लंडच्या संघाची घोषणाही झाली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने घेतलेल्या काही निर्णयांमुळे चाहत्यांबरोबरच क्रिकेट समीक्षकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. सध्या तुफान फॉर्ममध्ये असलेला फलंदाज हॅरी ब्रूकला संघातून वगळण्याचा निर्णय हा असाच थक्क करणारा निर्णय आहे. मात्र संघातून वगळल्यानंतर आठड्याभरातच हॅरी ब्रूकने दमदार शतक झळकावत बोर्डाला आरसा दाखवला आहे.


निवृत्ती मागे घेतलेल्याचा समावेश पण...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडचा संघ विश्वचषक स्पर्धेआधी न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय सामने आणि टी-20 सामने खेळणार आहे. या सामन्यासाठी निवडण्यात येणारा संघ हाच विश्वचषक स्पर्धेत उतरवला जाईल अशी दाट शक्यता आहे. सध्या जाहीर करण्यात आलेल्या संघामध्ये बदल करण्याची संधी इंग्लंडच्या बोर्डाकडे 27 सप्टेंबरपर्यंत असेल. इंग्लंडने 17 ऑगस्ट रोजी विश्वचषक स्पर्धा आणि एकदिवसीय मालिकेसाठी 15 सदस्यांचा संघ जाहीर केला. या 15 खेळाडूंमध्ये हॅरी ब्रूकचं नाव नव्हतं. उलट इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्ट्रोक्सने निवृत्ती मागे घेतल्यानंतर त्याचा समावेश संघात करण्यात आला. स्ट्रोक्सने मागील वर्षी एकदिवसीय क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय जाहीर केलेला. हॅरी ब्रूकला संघात स्थान मिळालं नसलं तरी त्याने सध्या सुरु असलेल्या 'द हंड्रेड' स्पर्धेमध्ये वेगवान शतक झळकावत निवड समितीला तुम्ही चूकत असल्याचा इशारा कामगिरीमधून दिला आहे.


एकटाच विरोधी संघावर तुटून पडला


वेल्स फायर संघाविरोधात खेळताना सुपरचार्जर्सच्या या फलंदाजाने दमदार फटकेबाजी केली. एकीकडे प्रथम फलंदाजी करणाऱ्या सुपरचार्जर्सच्या संघातील खेळाडू विकेट्स टाकत असताना दुसरीकडे हॅरी ब्रूक्सने तुफान फटकेबाजी केली. संघातील 7 खेळाडूंना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. पण हॅरी ब्रूक्स वेल्स फायरवर तुटून पडला. त्याने 11 चौकार आणि 7 षटकांच्या मदतीने 42 चेंडूंमध्ये 105 धावांची खेळी केली. केवळ 42 चेंडूंमध्ये त्याने ही कामगिरी केली. त्याने चौकार, षटकारांच्या मदतीने अवघ्या 18 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकांच्या मदतीने 86 धावा ((11x4)+(7x6)) केल्या. 


कसोटी, टी-20 मध्येही दमदार कामगिरी


हॅरी ब्रूकने इंग्लंडच्या संघाकडून खेळताना कसोटी आणि टी-20 मध्ये धडाकेबाजी खेळी केल्या आहेत. असं असतानाही हॅरी ब्रूकला इंग्लंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषक स्पर्धेच्या संघातून वगळल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. हॅरी ब्रूकने आतापर्यंत 3 एकदिवसीय सामने खेळले असून त्यात 86 धावा केल्या आहेत. हॅरी ब्रूकची कामगिरी पाहता त्याला विश्वचषक स्पर्धेत स्थान मिळेल असं मानलं जात होतं. मात्र चाहत्यांच्या पदरी निराशाच लागली आहे.


विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे इंग्लंडचा संघ - 


जॉस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस एटकिन्सन, जॉनी बेयरस्टो, सॅम करन, लियम लिविंगस्टन, डेविड मलान, आदिल रशीद, जो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉप्ले, डेविड विली, मार्क वूड, क्रिस वोक्स.