शेतात राबणारा ऑलिम्पिकपटू म्हणतोय, `होय मी शेतकरी आहे`
काळ्या आईची करनी तिला, लेकराची माया!
मुंबई : देशातील कोरोना रुग्णांचा आकडा लाखोंच्या घरात पोहोचला असतानाच महाराष्ट्रातही अशाच पद्धतीची परिस्थिती पाहायला मिळत आहे. राज्यातील विविध भागांमध्ये वाढणारा कोरोना रुग्णांचा आकडा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांपुढं अडचणींचा डोंगर उभा करत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणारं कोरोनाचं हे थैमान पाहता, त्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यातही लॉकडाऊन लागू करण्यात आलाय परिणामी सर्वच क्षेत्रांचे व्यवहार बऱ्याच अंशी ठप्प झाले होते. कला आणि क्रीडा विश्वही याला अपवाद ठरलं नाही. याच परिस्थितीच्या कचाट्यात सापडल्यामुळं कुठे अनेक खेळाडू त्यांच्या कुटुंबासमवेत वेळ व्यतीत करण्याला प्राधान्य देत आहेत. असं असताना ऑलिम्पिकमध्ये देशाच्या वतीनं खेळणाऱ्या एका खेळाडूनं थेट शेताची वाट धरली आहे.
लॉकडाऊनच्या काळात कोणत्याची स्पर्धेचं आयोजन केलं जात नसल्यामुळं नौकानयनपटू दत्तू भोकनळ यानं शेतीची कामं हाती घेतली आहेत. खुद्द त्यानंच सोशल मीडियावर आपल्या या वेगळ्या रुपातील फोटो शेअर केला.
मुळचा नाशिकच्या असणाऱ्या दत्तूनं फोटो पोस्ट करत त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलं,
'होय, मी एक शेतकरी आहे. घामाचे थेंब पेरून मातीतून मोती मिळवुन देणारा एकमेव कारागीर म्हणजे शेतकरी ...
काळ्या मातीत जन्म माझा काळ्या मातीशी नातं...
काळ्या आईची करनी तिला, लेकराची माया!
माय होईल हिरवी गान, हिरीताच गाया!
वरती आभाळाची हाये मला, बापावानी छाया!'.
'जय जवान जय किसान', असा घोषही त्यानं या ट्विटमध्ये केला. त्यानं हे ट्विट केल्यानंतर अनेकांनी दत्तूच्या या रुपाचंही तितक्याच मोठ्या मनानं स्वागत करत आपल्या मातीशी जोडले गेलेले त्याचे बंध अनेकांनाच भारावून गेले.