क्रिकेटच्या मैदानात नवा विक्रम! फक्त २० बॉलमध्ये मिळवला विजय
क्रिकेटच्या मैदानामध्ये एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे.
मुंबई : क्रिकेटच्या मैदानामध्ये एका नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. ओमानविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यामध्ये स्कॉटलंडचा फक्त २० बॉलमध्ये विजय झाला आहे. अल अमारतमध्ये झालेल्या या मॅचमध्ये स्कॉटलंडनं ओमानला १७.१ ओव्हरमध्ये २४ रनवर आऊट केलं. खावर अली हा ओमानचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. त्यानं या मॅचमध्ये १५ रन केल्या. खावर अली वगळता, कोणत्याही बॅट्समनला दोन अंकी धावसंख्या करता आली नाही. ओमानचे ५ बॅट्समन शून्यवर आऊट झाले, तर एक बॅट्समन शून्यवर नाबाद राहिला. स्कॉटलंडच्या रुआईध्री स्मिथनं ८ ओव्हरमध्ये ७ रन देऊन सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. आद्रीयन नेलनं ४.१ ओव्हरमध्ये ७ रन देऊन ४ विकेट घेतल्या. एलिस्डेअर इव्हान्सला २ विकेट घेण्यात यश आलं.
स्कॉटलंडनं हे आव्हान फक्त २० बॉलमध्ये पूर्ण केलं. ओपनिंगला आलेल्या कायल कोएत्झरनं नाबाद १६ आणि मॅथ्यू क्रॉसनं नाबाद १० रन केल्या. यामुळे स्कॉटलंडनं ओमानचा १० विकेटनं पराभव केला. ही संपूर्ण मॅच २०.३ ओव्हरमध्ये संपली. स्कॉटलंडचा आणि ओमानमधल्या या मॅचला आयसीसीनं आंतरराष्ट्रीय मॅचचा दर्जा दिला नव्हता. ही मॅच आंतरराष्ट्रीय असती तर उरलेल्या बॉलच्या हिशोबानं हा सगळ्यात मोठा विजय असता.
लिस्ट ए (आंतरराष्ट्रीय/स्थानिक) क्रिकेटमधला हा चौथा सर्वात कमी स्कोअर आहे. २००७ साली बारबाडोसविरुद्धच्या मॅचमध्ये वेस्ट इंडिज अंडर-१९ टीम १८ रनवर ऑल आऊट झाली होती. हा लिस्ट ए क्रिकेटमधला सगळ्यात कमी स्कोअर आहे. २०१२ साली कॉल्ट्स सीसीविरुद्ध सराकेन्स एससी या टीमचा १९ रनवर ऑल आऊट झाला होता. १९७४ साली यॉर्कशायरविरुद्धच्या मॅचमध्ये मिडलसेक्सची टीम २३ रनवर ऑल आऊट झाली होती.