पी.व्ही सिंधूकडून पंतप्रधानांना वाढदिवसाचे गिफ्ट
सध्या जबरदस्त फॉर्मात असलेली भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद जिंकत नवा इतिहास रचला.
नवी दिल्ली : सध्या जबरदस्त फॉर्मात असलेली भारताची बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधूने रविवारी कोरिया ओपन सुपर सीरिजचे जेतेपद जिंकत नवा इतिहास रचला.
तिने फायनलमध्ये वर्ल्ड चॅम्पियन जपानच्या नोझोमी ओकुहाराला २२-२०, ११-२१, २१-१८ असे तीन गेममध्ये नमवत जेतेपद उंचावले. सिंधूने आपले हे जेतेपद पंतप्रधान नरेंद्र मोदींना समर्पित केलेय.
रविवारी पंतप्रधान मोदींची ६७वा वाढदिवस होता. सिंधूने ट्विटवरुन आपला हा विजय पंतप्रधान श्री मोदीजी यांना समर्पित करत असल्याचे सांगितले.
सिंधूच्या या ट्विटला अनेक यूझर्सनी पसंती दर्शवली. तसेच अनेक रिट्विटही करण्यात आले.
सिंधूसाठी कोरिया ओपन सुपर सीरिजची फायनल सोपी नव्हती. पहिल्या गेममध्ये सिंधूला ओकुहाराने चांगली लढत दिली. १८-२० अशा पिछाडीवरुन सिंधूने २२-२० अशी आघाडी मिळवत पहिला गेम आपल्या नावे केला. पहिला गेम गमावल्यानंतर दुसऱ्या गेममध्ये ओकुहाराने आक्रमक खेळ करताना सिंधूला नमवले. त्यामुळे तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सामन्याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती.
तिसऱ्या गेममध्ये दोघीही एकमेकांना कडवी टक्कर देत होत्या. कधी सिंधू पुढे तर कधी ओकुहारा आघाडीवर. अखेर सिंधूने शेवटच्या क्षणी खेळ उंचावला आणि गेम जिंकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.