Bangladesh Win Test Series : बांगलादेशने सलग दुसऱ्या कसोटीत पाकिस्तानचा सहा गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह बांगलादेशने दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानचा धुव्वा उडवला असून मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. बांगलादेशने पहिली कसोटी 10 गडी राखून जिंकली होती. आता दुसऱ्या कसोटीमध्ये देखील बांगलादेशने पाकिस्तानला गुडघ्यावर टेकवलं आहे. त्यामुळे आता जगभरात पाकिस्तानची नाचक्की होत असल्याचं पहायला मिळतंय.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बांगलादेशच्या या ऐतिहासिक विजयात मेहंदी हसन मेराज, लिटन दास, हसन महमूद आणि नाहिद राणा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे रद्द झाला होता. पण दुसऱ्या दिवशी पाकिस्तानचे फलंदाज डगमगले अन् संपूर्ण संघ  केवळ 274 धावांवर गारद झाला. त्यानंतर बांगलादेशच्या पहिल्या डावात खराब सुरुवात झाली अन् 26 च्या धावसंख्येवर बांग्लाच्या 6 विकेट पडल्या. खरी कसोटी इथून सुरू झाली. लिटन दासने 138 धावा केल्या अन् पाकिस्तानला जोरदार उत्तर दिलं. मेहंदी हसन मेराजने 78 धावांची खेळी करत सर्वांना चकित केलं.


दोघांनी बांगलादेशचा डाव सावरला अन् 26 वरून 262 धावांचा चमत्कार घडला. पाकिस्तानच्या इज्जतीचा सवाल होता. मात्र, पुन्हा पाकिस्तानचे फलंदाज सपशेल फेल ठरले. अब्दुल्ला शफीक, बाबर आझम, शान मसूद आणि सौद शकील या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही अन् पाकिस्तानचा संघ केवळ 172 धावांवर बाद झाला. आता बांगलादेशसमोर इतिहास रचण्याची संधी होती. बांग्लादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य होतं अन् हातात 10 विकेट्स... बांगलादेशने ही कमिया करून दाखवली.


दरम्यान, चौथ्या दिवशी झाकीर हसन आणि शादमान इस्लाम यांनी चांगली सुरूवात केली पण पावसाने खोडा घातला अन् सामना पुन्हा थांबवण्यात आला. पाचवा दिवस दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता. बांग्लादेशला आणखी 143 धावा करायच्या होत्या. बांगलादेशच्या झाकीर हसन, शादमान इस्लाम, कर्णधार नझमुल हुसेन शांतो आणि मोमिनुल हकने दमदार फलंदाजी केली अन् पाकिस्तानच्या हातातून सामना हिरकावून घेतला. 


बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), शादमान इस्लाम, झाकीर हसन, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, लिटन दास (विकेटकीपर), शकीब अल हसन, मेहदी हसन मिराझ, हसन महमूद, तस्किन अहमद आणि नाहिद राणा.


पाकिस्तान प्लेइंग ईलेव्हन : शान मसूद (कॅप्टन), अब्दुल्ला शफीक, सैम अयुब, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), आगा सलमान, खुर्रम शहजाद, अबरार अहमद, मीर हमजा आणि मोहम्मद अली.