क्रिकेटर्स आणि मनोरंजन विश्वाचं नातं तसं जुनं आहे. अनेक क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींची नावं जोडण्यात येत असतात. यातील विराट आणि अनुष्काप्रमाणे काही नाती लग्नापर्यंत पोहोचली आहेत. याशिवाय हरभजन सिंग आणि युवराज सिंग असेही अनेक खेळाडू आहेत. क्रिकेटर्स आणि अभिनेत्रींमधील हे नातं फक्त भारतापुरतं मर्यादित नाही. काही अभिनेत्री परदेशी खेळाडूंच्या प्रेमातही पडल्या होत्या. दरम्यान पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईदने यासंदर्भात एक मोठं विधान केलं आहे. नवल सईदचे इंस्टाग्रामवर करोडो फॉलोअर्स आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवल सईदला एका कार्यक्रमात क्रिकेटर्सकडून येणाऱ्या मेसेजेसंबंधी विचारण्यात आलं असता तिने मोठा खुलासा केला. 'तुला एका तरी क्रिकेटरने मेसेज पाठवला का?', असा प्रश्न तिला टीव्ही अँकरने विचारला. त्यावर उत्तर देताना तिने म्हटलं की, "सिंगल राहणं गरजेचं आहे असं तुम्हाला का वाटत आहेत? मी यावर काहीच बोलणार नाही".


दरम्यान यावेळी अँकरने नसीम शाहपासून ते शोएब मलिकपर्यंत अनेक क्रिकेटर्सची नावं घेतली. पण यादरम्यान नवल सईदच्या चेहऱ्यावर फक्त हास्य होतं. यानंतर तिने मागील एका कार्यक्रमाचा उल्लेख केला, ज्यामध्ये तिने क्रिकेटर्स संदेश पाठवत असल्याचा खुलासा केला होता. "वर्ल्डकपदरम्यान तो कार्यक्रम रेकॉर्ड करण्यात आला होता. मी प्रसिद्धी मिळवण्यासाठी तसं विधान केलं होतं असं लोकांना वाटत होतं. पण तसं काहीही नव्हतं. मी तसं बोलायला नको होतं. लोक तुम्हाला संदेश पाठवू शकतात. त्यात काही गैर नाही," असं ती म्हणाली.


"मला फक्त असं वाटतं की, क्रिकेटर्सनी असं वागू नये. याचं कारण लोक अभिनेते, अभिनेत्री यांच्यापेक्षा क्रिकेटर्स, खेळाडू यांना जास्त आदर्श मानतात," असं स्पष्टीकरण तिने दिलं. 25 वर्षीय नवल सईदने टीव्हीमधून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. 2022 पासून ती चित्रपटांमध्येही काम करु लागली आहे.