आशिया कप कुठे होणार? गांगुलीच्या उत्तरानंतर पाकिस्तानची नवी चाल
यंदाच्या वर्षी होणारा आशिया कप दुबईमध्ये खेळवला जाईल.
मुंबई : यंदाच्या वर्षी होणारा आशिया कप दुबईमध्ये खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानच्या टीम या स्पर्धेत सहभागी होतील, असं वक्तव्य बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केलं. पण पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र ही स्पर्धा कुठे होईल, याचा निर्णय आशियाई क्रिकेट परिषद घेईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपआधी आशिया कप टी-२० स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. खरतर यंदाच्या आशिया कप स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानमध्ये होणं अपेक्षित आहे. पण भारत आणि पाकिस्तान यांच्यात खराब संबंध असल्यामुळे भारत मागच्या कित्येक वर्षात पाकिस्तानमध्ये गेला नाही.
२०१८ साली झालेल्या आशिया कपचं आयोजन भारतात होणार होतं. पण पाकिस्तानी टीमला व्हिजा मिळवण्यात अडचणी येत असल्यामुळे त्यावेळीही ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती.
'स्पर्धेची जबाबदारी आशियाई क्रिकेट परिषदेवर आहे. त्यामुळे ठिकाण बदलण्याचा अधिकार फक्त याच संस्थेला आहे. परिषदेची बैठक ३ मार्चला होणार आहे. याच बैठकीत सगळ्या देशांच्या हिताचा विचार करुन निर्णय घेतला जाईल,' अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने केलं आहे.