मुंबई : पाकिस्तान क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शोएब अख्तर जेव्हा गोलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरायचा, तेव्हा अनेक दिग्गज फलंदाजांचा थरकाप उडायचा. 160 किमी प्रती तास वेगाने चेंडू टाकणाऱ्या शोएबने आपल्या कारकिर्दीत सचिन तेंडुलकरपासून रिकी पाँटिंगसारख्या दिग्गजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला. त्याच्या याच वेगवान गोलंदाजीमुळे त्याला रावळपिंडी एक्स्प्रेस असं नाव पडलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरने चेंडू टाकण्यासाठी घेतलेला रनअप बघूनच मोठ मोठ्या फलंदाजांना घाम फुटायचा. शोएब अख्तरने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेटच्या मैदानावरची त्याची दहशत कमी झालेली नाही. पण शोएब अख्तरसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. स्वत: शोएब अख्तरने या बातमीला दुजोरा दिला आहे.


कायमचा ब्रेक लागणार
रावळपिंडी एक्स्प्रेसला आता कायमचा ब्रेक लागणार आहे. शोएबच्या चाहत्यांसाठी हा मोठा धक्का आहे कारण वेगाचा बादशहा आता कधीच धावू शकणार नाही. शोएबने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हटलं आहे, माझे धावण्याचे दिवस संपले आहेत कारण माझ्या गु़डघ्याचं प्रत्यारोपण होणार आहे, मी लवकरच ऑस्ट्रेलिया मेलबर्नसाठी रवाना होणार आहे.


शोएब अख्तरने सोशल मीडियावर ही माहिती दिल्यानंतर त्याच्या असंख्य चाहत्यांनी काळजी व्यक्त करत लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 



शोएब अख्तर आणि वाद
शोएब अख्तर अलीकडच्या काळात खूप चर्चेत होता. पाकिस्तानच्या अधिकृत चॅनल पीटीव्ही स्पोर्ट्सचे अँकर नौमान नियाज यांच्याशी शोएबचा वाद चांगलाच चर्चेत आला होता. त्यानंतर पाकिस्तानच्या माजी वेगवान गोलंदाजाने थेट टीव्ही शोमध्येच राजीनामा देण्याची घोषणा केली होती. मात्र, नंतर अँकर नौमान नियाजने अख्तरची माफी मागितली.


पाकिस्तानसाठी मोठी कारकीर्द
शोएभ अख्तरने 2011 मध्ये क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती स्विकारली. त्याने पाकिस्तानसाठी 46 कसोटी, 163 एकदिवसीय आणि 15 टी20 सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. कसोटीत शोएभने 25.69 च्या सरासरीने तब्बल 178 विकेट घेतल्या आहेत. तर एकदिवसीय सामन्यात 24.97च्या सरासरीने 247 विकेट त्याच्या नावावर आहेत. टी20 सामन्यात 19 विकेट त्याच्या नावावर जमा आहेत.