इस्लामाबाद : ऑस्ट्रेलियातल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताचा २-१नं ऐतिहासिक विजय झाला. मागच्या ७१ वर्षातला भारतानं ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकली आहे. याचबरोबर ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा आशिया खंडातला पहिला देश ठरला आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी भारतीय टीमचं अभिनंदन केलं आहे. ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट सीरिज जिंकणारा भारत हा आशिया खंडातला पहिला देश ठरल्यामुळे विराट कोहली आणि त्याच्या टीमचं अभिनंदन, असं ट्विट इम्रान खान यांनी केलं आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर शोएब अख्तर यानंही भारताच्या या कामगिरीचं कौतुक केलं आहे. ऑस्ट्रेलियातल्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय टीमचं अभिनंदन. ऑस्ट्रेलियाचा दौरा हा जगतला सगळ्यात कठीण दौरा असतो. ऑस्ट्रेलियाला संपूर्ण सीरिजमध्ये दबावात ठेवणं ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती, असं शोएब अख्तर म्हणाला.


सिडनीमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टच्या शेवटच्या दिवसाचा खेळ पावसामुळे होऊ शकला नाही. चौथ्या दिवशीही पाऊस आणि खराब प्रकाशामुळे १०० मिनिटांचाच खेळ होऊ शकला. या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये भारतानं ६२२ रन केल्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम ३०० रनवर ऑल आऊट झाली. यानंतर भारतानं ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला. मागच्या ३० वर्षांमध्ये ऑस्ट्रेलियाला पहिल्यांदाच त्यांच्या घरच्या मैदानात फॉलोऑनची नामुष्की ओढावली.


फॉलोऑन मिळाल्यानंतर बॅटिंगला आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या मदतीला हवामान धावून आलं. दुसऱ्या इनिंगमध्ये फक्त ४ ओव्हरचाच खेळ झाला आणि खराब प्रकाशामुळे चौथ्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला. पावसामुळे पाचव्या दिवसाचा खेळ होऊ शकला नाही आणि ही टेस्ट मॅच ड्रॉ झाली. ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या टेस्टमध्ये आणि मेलबर्नमध्ये झालेल्या तिसऱ्या टेस्टमध्ये भारताचा विजय झाला होता, तर पर्थमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


विराटची प्रतिक्रिया


यापेक्षा जास्त अभिमानाचा क्षण माझ्या आयुष्यात आला नव्हता. या टीमचं नेतृत्व करण्याची संधी मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची आणि भाग्याची गोष्ट आहे. टीममधल्या खेळाडूंमुळेच माझी मान अभिमानानं उंचावली आहे, असं विराट कोहली या विजयानंतर म्हणाला.


भारतानं २०११ सालचा वर्ल्ड कप जिंकला तेव्हा मी युवा खेळाडू होतो. त्यावेळी मी टीममधल्या दुसऱ्या खेळाडूंना भावूक होताना पाहिलं पण मी स्वत: भावूक झालो नव्हतो. यावेळचा क्षण मात्र मला भावूक करणारा असल्याचं विराटनं सांगितलं. चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल यांच्या कामगिरीचं विराटनं कौतुक केलं. तसंच गेल्या काही दिवसांपासून भारतीय फास्ट बॉलरची कामगिरी पाहता, ते अनेक रेकॉर्ड मोडतील, असा विश्वास विराटनं व्यक्त केला.


१९८३ च्या वर्ल्ड कपपेक्षा मोठा विजय


भारतीय टीमनं मिळवेलला हा विजय १९८३ सालच्या वर्ल्ड कप विजयापेक्षा मोठा असल्याचं वक्तव्य भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी केलं. टेस्ट क्रिकेट हे सर्वोत्तम दर्जाचं क्रिकेट असतं, त्यामुळे हा विजय सगळ्यात मोठा तसंच १९८३ सालचा वर्ल्ड कपपेक्षाही मोठा असल्याची प्रतिक्रिया रवी शास्त्रींनी दिली होती.