Pakistan Suryakumar Yadav Video: भारतीय क्रिकेट संघाला 2024 चा टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सामन्यातील टर्निंग पाइंट ठरलेला सूर्यकुमार यादवने पकडलेला कॅच आजही क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेत आहे. हा एक कॅच पकडून सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या अंतिम सामन्यातील पारडे भारताच्या बाजूने झुकवत हिरो ठरला. सूर्यकुमारसारखाच सीमारेषेजवळ भन्नाट झेल पकडण्याची आयती संधी पाकिसातानच्या एका खेळाडूच्या वाट्याला आली होती. सध्या पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स वन-डे कप स्पर्धेचे सामने सुरु आहेत. फैसलाबादच्या इक्बाल स्टेडियममध्ये या स्पर्धेचा पहिला सामना 14 सप्टेंबर रोजी डॉलफिन्स विरुद्ध पँथर्स संघांदरम्यान झाला. याच सामन्यात सूर्यकुमारच्या कॅचची आठवण करुन देणारा हा घटनाक्रम पाहायला मिळाला.


घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पँथर्सच्या संघाने प्रथम फलंदाजी करत 329 धावांचं लक्ष्य डॉलफिन्सच्या संघाला दिलं. धावांचा पाठलाग करताना डॉलफिन्सच्या फलंदाजीच्या वेळी 18 व्या षटकामध्ये मोहम्मद अकलाकने उस्मार मीरच्या गोलंदाजीवर एक उंच फटका मारला. लाँग ऑफच्या दिशेने हवेतून मारलेला उत्तुंग फटका षटकार जाणार की झेल हे फटका मारल्यानंतर काही काळ समजत नव्हतं. लाँग ऑफला फिल्डींग करत असलेला सायम आयूबने हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न करु असं म्हणत अगदी सीमारेषेजवळ हवेत झेप घेतली. षटकार जाणारा चेंडू आयूबला पकडता येईल असं पाहता क्षणी तरी वाटत होतं. 


चेंडू हातात बसला पण...


विशेष म्हणजे झालंही तसेच, चेंडू थेट आयूबच्या हातात बसला. मात्र आयूबने सीमारेषेजवळ मारलेल्या उडीमुळे बॅलेन्स संभाळता आलं नाही. सूर्यकुमार यादवने ज्याप्रमाणे टी-20 वर्ल्ड कप फायनलमध्ये आधी चेंडू पकडून सीमारेषेला स्पर्श करताना तो हवेत उडवत पुन्हा मैदानात येऊन झेल घेतला होता तसा प्रयत्न आयबूनेही केली. मात्र या दुसऱ्या प्रयत्नात आपण चेंडू पुन्हा मैदानात उडवून हा झेल पूर्ण करु असं आयूबला वाटलं होतं. मात्र त्याचं संतुलन बिघडलं आणि चेंडू सीमारेषेपलीकडे पडला. अकलाकला 6 धावा मिळाल्या. 



'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव'


अनेकांना आयूबने केलेला हा प्रयत्न पाहून सूर्यकुमार यादवची आठवण झाली आहे. बऱ्याच जणांनी 'पाकिस्तानचा सूर्यकुमार यादव' अशा कमेंट्स या व्हिडीओखाली केल्या असल्या तरी पाकिस्तानचे खेळाडू समोरच्या संघाकडून खेळतात असा टोला अनेकांनी लगावला आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंना अनेकदा त्यांच्या सुमार फिल्डींगवरुन ट्रोल केलं जातं. मात्र आयूबने केलेला हा प्रयत्न खरोखरच उत्तम होता. तरीही त्याला झेल पूर्ण करण्यात यश आलं नाही आणि त्याने सहा धावाही दिल्याने त्याला ट्रोल केलं जात आहे.