World Cup 2023: वर्ल्डकप सुरु झाला असून पाकिस्तान समोरच्या अडचणी काही संपायचं नाव घेत नाहीयेत. वर्ल्डकपपूर्वी खेळाडूंना व्हिसा मिळत नव्हता, तर आता स्पर्धा सुरु झाली असून पाकचे बरेच खेळाडू आजारी पडले आहेत. पाकच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंना व्हायरलचा त्रास झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे पाकिस्तानच्या टीमचं टेन्शन चांगलंच वाढलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या वर्ल्डकपच्या सामन्यात पाकिस्तानला भारताविरुद्ध 7 विकेट्स राखून पराभवाचा सामना करावा लागला. आता पाकिस्तानचा पुढील सामना 20 ऑक्टोबर रोजी बंगळुरूमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. त्याचपूर्वी खेळाडू आजारी पडल्याने टीमला धक्का बसला आहे. 


20 ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तान क्रिकेट टीमची तयारी सुरु आहे. मात्र यावेळी टीमचे खेळाडू आजारी पडले आहेत. टीमच्या अनेक प्रमुख खेळाडूंना छातीच्या संसर्गाची तक्रार जाणवतेय. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तान क्रिकेट टीमचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीला व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन झालं आहे. शाहीन शाह आफ्रिदीची प्रकृती मात्र आता सुधारत असून त्याने अँटीबायोटिक ड्रिप आणि वैद्यकीय मदत घेतलीये.


अब्दुल्ला शफीकला आला ताप


पाकिस्तानी क्रिकेट टीमचा सलामीवीर अब्दुल्ला शफीक हा देखील आजारी पडला आहे. शफीकला खूप ताप आला असून डॉक्टर सध्या त्याच्या प्रकृतीची तपासणी करतायत. पाकिस्तानी क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज जमान खान देखील व्हायरल इन्फेक्शनचा बळी पडलाय. 


उसामा मीरला केलं क्वारंटाईन


पाकिस्तानच्या टीमचा लेग स्पिनर उसामा मीर याला देखील व्हायरल इन्फेक्शनची लागण झाली आहे. गेल्या 5 दिवसांपासून त्याला ही समस्या जाणवतेय. खबरदारी म्हणून मीरला क्वांरटईन ठेवण्यात आलं होतं. यावेळी कोविड-19 आणि डेंग्यू यांच्यासोबत केलेल्या सर्व चाचण्यांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 


खेळाडूंच्या प्रकृतीत होतेय सुधारणा


दरम्यान मीरच्या तब्येतील आता सुधारणा झाली असून तो पुढच्या सामन्यासाठी त्याची निवड होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान क्रिकेट टीमच्या मीडिया मॅनेजरने सांगितलं की, क्रिकेटपटूंमध्ये सुधारणा होण्याची चिन्हं दिसतायत. आरोग्याच्या तक्रारींमुळे क्रिकेट टीमचं एक सराव सत्र रद्द करण्यात आलं. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य स्पष्ट झालं.