कराची : पाकिस्तान क्रिकेट टीमचा खेळाडू उमर अकमलनं प्रशिक्षक मिकी ऑथरवर गंभीर आरोप केला आहे. लाहोरमध्ये असलेल्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीमध्ये ऑथरनं मला शिव्या दिल्या असं उमर अकमल म्हणाला आहे. इंझमाम उल हक आणि मुश्ताक अहमदही त्या ठिकाणी उपस्थित असल्याचा दावा अकमलनं केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उमर अकमल गुडघ्याचं ऑपरेशन करून सरावासाठी नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये आला असताना हा वाद झाला आहे. मी अकॅडमीमध्ये सरावासाठी गेलो असताना मला बॅटिंग कोच ग्रँट फ्लॉवरनं रोखलं. बोर्डनं परवानगी दिलेल्यांनाच सराव करता येईल, असं मला सांगण्यात आल्याचं अकमल म्हणाला. या सगळ्या प्रकरणानंतर मी मुख्य प्रशिक्षक मिकी ऑथरकडे गेलो पण त्यानंही मला तेच उत्तर दिल्याचं अकमलनं सांगितलं आहे.


फिट नसल्यामुळे तुला अॅकॅडमीमध्ये सरावाला परवानगी देण्यात आलं नसल्याचं इंझमाम आणि मुश्ताक अहमद म्हणाले आणि पुन्हा एकदा ऑथरकडे जायला सांगितलं. ज्यावेळी मी पुन्हा ऑथरकडे गेलो तेव्हा त्यानं मला शिव्या दिल्याचा आरोप अकमलनं केला आहे.


याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं उमर अकमलला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. उमरनं हा मुद्दा माध्यमांसमोर मांडल्यानं त्याला ही नोटिस बजावण्यात आली आहे. उमर अकमलनं खेळाडूंवर असेलले निर्बंध आणि नियमांचं उल्लंघन केल्याचं पीसीबीनं सांगितलं आहे.