मुंबई : भारताविरोधात कायम कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्ताननं आता क्रिकेटच्या आडून घाणरेडं राजकारण सुरू केलंय. काश्मीरवरून सतत भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या पाकिस्ताननं आणखी एक नापाक डाव आखलाय. हा डाव खेळाच्या मैदानातला आहेत. पाकिस्ताननं पाकव्याप्त काश्मीरमध्ये 'काश्मीर प्रीमिअर लीग'चं आयोजन केलंय. या स्पर्धेत पाकिस्तानी खेळांडूसह काही परदेशी खेळाडू सहभागी होणार आहेत. एकीकडे भारताविरोधात दहशतवादाला खतपाणी घालायचं आणि दुसरीकडे क्रिकेट पॉलिटिक्स आडून काश्मिरी जनतेची सहानुभूती मिळवायची असाच काहीसा हा प्रकार सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 ते 16 ऑगस्ट दरम्यान पाकव्याप्त काश्मिरात हि लीग होणार आहे. यात 6 फ्रांचायझीचा समावेश करण्यात आलाय. बाग स्टालियन, मीरपूर रॉयल्स, मुजफ्फराबाद टायगर्स, ओवरसीज वॉरियर्स, कोटली लायन्स आणि रावळकोट हॉक्स अशा टीम्स यात असतील. या लीगसाठी पाकिस्ताननं तिलकरत्ने दिलशान, मॅट प्रायर, मॉन्टी पानेसर अशा विदेशी खेळाडूंसोबत करारही केलाय. मुज्जफराबादमधल्या स्टेडियममध्ये या सामन्यांचं आयोजन करण्यात आलंय. 


खरं तर पाकव्याप्त काश्मीरसह गिलगिट-बाल्टिस्तान भारताचा हिस्सा आहे. मात्र पाकिस्ताननं अवैध मार्गानं त्यावर कब्जा केलाय. आता या भागावर वर्चस्व दाखवण्याचा पाकिस्तानचा केविलवाणा प्रयत्न सुरूंय. क्रिकेट लीगमधून पाकिस्ताननं कितीही खिलाडूवृत्तीचा आव आणला तरी त्यांचा कुटील डाव आणि दहशवादाचा बुरखा नेहमीसारखा फाटल्याशिवाय राहणार नाही.