Paralympics 2024 Avani Lekhara Won Gold Medal : ऑलिम्पिक 2024 नंतर आता पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 या स्पर्धेला सुरुवात झाली आहे. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस असून नेमबाज अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली आहे. अवनी हिने 2020 रोजी टोकियो पॅरालिम्पिकमध्येही सुवर्ण पदकाला गवसणी घातली होती. अवनी सह भारताची अजून एक नेमबाज मोना अग्रवाल हिने सुद्धा या स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॅरिसमध्ये पॅरालिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग एसएच1 स्पर्धेत अवनी लेखराने सुवर्ण कामगिरी केली. या स्पर्धेत अवनीने 249.7 गुणांची कमाई केली. तर मोना अग्रवालने 228.7 मिळवत कांस्य पदक जिंकले. या स्पर्धेचं रौप्य पदक हे दक्षिण कोरियाच्या युनरी ली हिने पटकावलं. दुसऱ्याच दिवशी भारताच्या खात्यात एक सुवर्ण आणि एक कांस्य पदकाचा समावेश झाल्याने क्रीडा विश्वात उत्साहाचे वातावरण आहे.


कोण आहे अवनी लेखरा? 


भारताची नेमबाज अवनी लेखरा ही भारताची आघाडीची नेमबाज असून तिने टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारताला दोन पदक जिंकवून दिले होते. अवनी ही भारताची पहिली महिला ऍथलिट आहे जिने पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला एकाच वर्षी तब्बल दोन पदक जिंकवून दिली होती. अवनीने 2020 च्या पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एअर रायफलमध्ये सुवर्ण तर 50 मीटर रायफल थ्री पोजिशनमध्ये कांस्य पदक जिंकलं होतं. 2012 रोजी अवनी लेखरा हिचा भीषण रस्ते अपघात झाला होता, या अपघातात अवनीच्या कंबरेखालचा भाग निकामी झाला.  2022 मध्ये अवनीच्या नेमबाजीतील योगदानाबद्दल तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


हेही वाचा : 'मुलगा नेता झाला नाही पण नेत्यांपेक्षा पॉवरफुल...' जय शाह ICC चेअरमन झाल्यावर ममता बॅनर्जींची पोस्ट


भारताकडून यंदा पॅरालिम्पिकमध्ये 84 खेळाडूंचा सहभाग : 


पॅरिस पॅरालिम्पिक 2024 साठी भारताने यंदा 84 खेळाडूंचा समूह पाठवला आहे. हे खेळाडू विविध 12 स्पर्धांमध्ये भाग घेणार असून यात 52 पुरुष तर 32 महिला खेळाडूंचा समावेश आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 स्पर्धेची सांगता 9  सप्टेंबरला होईल.