Swapnil Kusale Bronze Medal : पॅरीस ऑलिंपिकमध्ये नेमबाजीत कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील कुसाळे (Swapnil Kusale) महाराष्ट्राचा अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी स्वप्नीलचे अभिनंदन केलं आहे. कोल्हापुरच्या नेमबाज स्वप्नील कुसाळे याने नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कांस्य पदक पटकावलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्र्यांकडून स्वप्नीलचं अभिनंदन
स्वप्नीलमुळे कुस्तीमध्ये भारतासाठी वैयक्तिक पहिले पदक पटकावणाऱ्या खाशाबा जाधव यांचे स्मरण झालं. तब्बल 72 वर्षांनी स्वप्नीलने महाराष्ट्रासाठी या पदकाचा वेध घेऊन, तशाच पद्धतीचा आनंद आणि उत्साह राज्यातील क्रीडा क्षेत्रासाठी निर्माण केला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात नेमबाजीची एक मोठी परंपरा आहे. ही परंपरा स्वप्नीलने कायम राखली आहे. कांबळवाडी सारख्या ग्रामीण भागातून येऊन स्वप्नीलने आपले राज्य आणि देशाचे नाव आंतरराष्ट्रीयस्तरावर झळकवले आहे. देशासाठी वैयक्तिक पदकाची कमाई करताना, स्वप्नीलने महाराष्ट्राचा क्रीडा क्षेत्रातील गौरव वाढवला आहे. स्वप्नीलच्या या यशात त्यांचे कुटुंबिय, प्रशिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे योगदान आहे, या सर्वांचे महाराष्ट्रातील तमाम जनतेच्यावतीने अभिनंदन, असे नमूद करून मुख्यमंत्र्यानी यापुढेही स्वप्नीलच्या वाटचालीसाठी आवश्यक असे सर्व ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसंच त्याला स्पर्धेतील पुढील वाटचालीसाठी मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा दिल्या.


स्वप्निल कुसाळेची ऐतिहासिक कामगिरी
पॅरिस ऑलिम्पिक 2024 (Paris Olympic 2024) मध्ये नेमबाज स्वप्नील कुसाळेनं 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत स्वप्नीलने एकूण 451.4 गुण मिळवले. भारताचं पॅरिस ऑलिम्पिकमधील हे तिसरं मेडल आहे. स्वप्नील कुसाळे हा महाराष्ट्रातील कोल्हापूरमधल्या कांबळवाडी गावातील आहे. तब्बल 72 वर्षांनंतर महाराष्ट्राला ऑलिम्पिकमध्ये स्वप्निलने पदक मिळवून दिलंय. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये खासाबा जाधव यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलं होतं.. आता असाच ऐतिहासिक पराक्रम करून स्वप्नील दुसरा मराठमोळा खेळाडू ठरलाय.


अंतिम फेरीत दमदार कामगिरी
अंतिम फेरीत स्वप्नील 6 व्या स्थानी होता. अंतिम फेरीत एकूण 8 स्पर्धक होते. प्रत्येक नेमबाजाला 40 शॉट्सची संधी होती. 40 शॉट्सनंतर कमी गुण असलेले दोन खेळाडू बाहेर गेले. पहिली फेरी पूर्ण झाली तेव्हा स्वप्नील 5 व्या स्थानी होता. फायनलमध्ये स्वप्नीलनं चमकदार कामगिरी करत तिसऱ्या स्थानी मजल मारली. तेव्हाच स्वप्नीलचं ब्राँझ पदक पक्क झालं