Indian Hockey Team : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीत सिंहच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची (Bronze Medal) कमाई केली. कांस्य पदकासाठी झालेल्या सामन्यात टीम इंडियने (Indian Hockey Team) स्पेनचा 2-1 असा पराभव केला. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवण्याचा विक्रम भारतीय हॉकी संघाने रचला आहे. याआधी 2020 टोकियो ऑलिम्पिकमध्येही भारतीय हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली होती. आता पॅरिस ऑलिम्पिकमध्येही (Paris Olympic 2024) कांस्य पदक पटकावत टीम इंडियाने इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीनंतर भारतीय हॉकी संघाचं मायदेशात आगमन झालंय. दिल्ली विमानतळावर ढोल-ताशांच्या गजरात भारतीय हॉकी खेळाडूंचं स्वागत करण्यात आलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर वाद
या दरम्यान सोशल मीडियावर एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भारतीय हॉकी संघाचा अपमान झाल्याचा आरोप केला जात आहे. भारतीय हॉकी खेळाडूंच्या स्वागतासाठी सकाळपासूनच क्रीडा चाहते दिल्ली विमानतळावर उपस्थित होते. खेळाडूंचं आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात खेळाडूंचं जल्लोषात स्वागत झालं. पण टी20 वर्ल्ड कप जिंकून भारतात आलेल्या क्रिकेट खेळाडूंच्या तुलनेत हॉकी खेळाडूंचं स्वागत अगदीच सामान्य होतं, असा आरोप सोशल मीडियावर काही युजर्सने केला आहे. 



आपल्या देशात क्रिकेट हा सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे, या तुलनेत इतर खेळांना नेहमीच दुय्यम स्थान दिलं गेलं आहे. यावेळी देखील पुन्हा हेच पाहायला मिळालं, असा आरोप होतोय. ज्या बसमधून भारतीय हॉकी खेळाडूंना घेऊन जाण्यात आलं, त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या भारतीय हॉकी खेळाडूंसाठी साधारण वोल्वो बस मागवण्यात आली होती. यात कोणत्या सुविधा देखील नव्हता. भारतीय क्रिकेट खेळाडूंना दिल्ली विमानतळावरुन लक्झरी बसने आणण्यात आलं होतं. या दोन्ही बसचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामुळे क्रीडा चाहत्यांनी भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. 



ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाचा दबदबा
ऑलिम्पिक इतिहासात हॉकी क्रीडा प्रकारात भारत हा सर्वात यशस्वी देश आहे. ऑलिम्पिक हॉकीत भारताने आतापर्यंत 8 सुवर्ण, 1 रौप्य आणि चार कांस्य पदकं पटकावली आहे. 1928 पासून भारत ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे. सलग सहा ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकं पटकावण्याचा विक्रम भारतीय हॉकी संघाच्या नावावर आहे.