Paris Olympics 2024 Racewalk : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली भारताची रेसवॉक अॅथलीट प्रियंका गोस्वामी (Priyanak Goswami) सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल होत आहे. गेल्या आठवड्यात प्रियंका गोस्वामीने महिलांच्या 20 किलोमीटर रेसवॉकमध्ये (Racewalk) भाग घेतला होता. 43 खेळाडूंमध्ये प्रियंकाचा 41 वा नंबर आला. यादरम्यान प्रियंका गोस्वामीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामुळे भारतीय क्रीडा चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे. रिल्स (Reels) बनवण्यापेक्षा आपल्या कामगिरीवर लक्ष दे असं क्रीडा चाहत्यांनी तिला सुनावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे व्हिडिओत
सामन्यानंतर प्रियंका गोस्वामी हिने ऑलिम्पिक व्हिलेजमधल्या आपल्या रुममध्ये एक व्हिडिओ बनवला आहे. या व्हिडिओत सुरुवातील ती बेडवर झोपलेली दिसत असून तिच्यासमोर टेबलफॅन सुरु आहे, त्यानंतर ती उठते आणि हवेत हातवारे करताच टेबल फॅनच्या जागी एसी येतो. त्यानंतर ती पुन्हा जाऊन आपल्या बेडवर चादर डोक्यावर ओढून झोपते. हा व्हिडिओ प्रियंका गोस्वामीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी संतप्त प्रतिक्रिया सुरु केल्या. यानंतर प्रियंकाने इन्स्टाग्रामवरुन हा व्हिडिओ डिलीट केला आहे. पण सोशल मीडियावर हा व्हिडिओ उपलब्ध आहे.


प्रियंका गोस्वामीची कामगिरी
प्रियंका गोस्वामीने 20 किलोमीटर रेसवॉकमध्ये 1:39:55 ची वेळ नोंदवली. तर याच प्रकारात सुवर्णपदक जिंकणाऱ्या चीनच्या खेळाडूने 1:25:54 सेकंदाची वेळ नोंदवली होती. म्हणजे प्रियंका गोस्वामी आणि पहिल्या क्रमांकाच्या खेळाडूत तब्बल 14 मिनिटांचं अंतर होतं. यावरुन या प्रकारात प्रियंकाला आणखी किती तयारी करावी लागेल याचा अंदाज येतो. त्यामुळेच प्रियंकाने हा खेळ गांभीर्याने घेत आपल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करावं आणि अधिक मेहनत घेऊन पुढच्या ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करावी अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली आहे. 



काही चाहत्यांचा प्रियंकाला पाठिंबा
एकीकडे प्रियंकाला ट्रोल केलं जात असतानाच दुसरीकडे काही क्रीडा चाहत्यांनी प्रियंकाला पाठिंबाही दिला आहे. ऑलम्पिकमध्ये पात्र होणं हे देखील कौतुकास्पद असल्याचं काही युजर्सने म्हटलंय. प्रियंका ही भारतीय रेल्वेत नोकरी करते. ऑलिम्पिकसाठी तीने स्वित्झर्लंडमध्ये सराव केला होता. 


प्रियंका गोस्वामी ही 20 किलोमीटर रेसवॉकमध्ये पात्र ठरणारी एकमेव भारतीय खेळाडू आहे. यासाठी तिचं कौतुक करायला हवं, असंही काही युजर्सने म्हटलं आहे. 2022 मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये प्रियंका गोस्वामीने रौप्य पदक जिंकलं होतं. पण पॅरिस ऑलिम्पिकमधून तिला रिकाम्या हाताने परतावं लागलं.