Paris Olympics 2024 : विनेश फोगटने रचला इतिहास; कुस्तीच्या फायनलमध्ये मारली धडक
Vinesh Phogat In the final : पॅरीस ऑलिम्पिकमध्ये विनेश फोगाटने 50 किलो वजनीगटाच्या फायनलमध्ये एन्ट्री मारली आहे.
Paris Olympics 2024 : पॅरीस ऑलिम्पिकचा 11 वा दिवस भारतासाठी महत्त्वपूर्ण ठरला. कुस्तीपटू विनेश फोगटने फायनलमध्ये धडक दिली आहे. भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगटने इतिहास रचला आहे. अंतिम फेरीत प्रवेश करून तिने पदक निश्चित केले आहे. मंगळवारी तिने महिलांच्या 50 किलो फ्रीस्टाइल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत क्युबाची कुस्तीपटू युस्नेलिस गुझमनचा 5-0 असा पराभव केला. आता विनेशचा फायनल सामना बुधवारी होणार आहे.
फायनलमध्ये पोहोचणारी विनेश पहिली भारतीय
ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत पोहोचणारी विनेश ही भारतातील पहिली महिला कुस्तीपटू ठरली आहे. त्यामुळे विनेश फोगटने इतिहास रचला आहे. विनेश फोगटने क्वार्टर फायनल फेरीत उत्तम विजय मिळवला होता. तिने युक्रेनच्या ओस्काना लिवाचचा 7-5 असा पराभव केला. विनेशने प्री-क्वार्टर फायनलमध्ये विद्यमान चॅम्पियन जपानच्या सुसाई युईचा पराभव केला होता. विनेशने पहिल्यांदाच ऑलिम्पिक स्पर्धेची सेमीफायनल गाठली होती. याआधी 2016 आणि 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तिला क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता.
कॉमनवेल्थमध्ये 3 गोल्ड मेडल विजेती आहे विनेश
विनेश फोगटने कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग 3 गोल्ड मेडल जिंकले आहे. यावेळी तिने 2014 ग्लासगो, 2018 गोल्ड कोस्ट आणि 2022 बर्मिंगहॅम गेम्समध्ये गोल्ड मेडलची कमाई केली होती. याशिवाय 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेतही विनेशने गोल्ड मेडलला गवसणी घातली होती. आशियाई चॅम्पियनशिप 2021 मध्येही गोल्ड मेडल विनेशनेच जिंकलं होतं.
विनेश फोगटने एशियन चॅम्पियनशीपच्या सामन्यात 3 सिल्वर मेडल जिंकले आहेत. तर वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये विनेशने 2 वेळा ब्रॉन्झ मेडल जिंकले आहेत. आता विनेश फायनलला गेल्याने सुवर्ण पदक किंवा रौप्य पदक निश्चित झालं आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोणता निर्णय लागणार? यावर आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकनंतर विनेशवर बंदी घालण्यात आली होती. बृजभूषण शरण सिंह यांनी विनेशला टार्गेट करत 'आम्ही खोटा सिक्का पाठवला होता', अशी टीका केली होती. त्यानंतर विनेश फोगाट डिप्रेशनमध्ये गेली. डॉक्टरांनी तिला कुस्ती थांबवण्याचं आवाहन देखील केलं होतं. पण विनेश थांबली नाही. एकीकडे रस्त्यावर कुस्तीपटूंसाठी उभी असताना विनेशने सराव करत होती. कुटुंबाने तिला प्रेरित केलं आणि तिला नेहमीच पाठिंबा दिला. कुटुंबाच्या पाठिंब्याने विनेश बरी झाली. कुस्तीमध्ये परतली आणि राष्ट्रकुलमध्ये गोल्ड जिंकलं. त्यानंतर आता विनेशने सर्व आव्हान पार करत सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारली होती.