नोएडा : टीम इंडियाचा फास्ट बॉलर परविंदर अवानावर पाच जणांनी हल्ला केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. भांडण सोडवायला गेलेला असताना परविंदरवर हा हल्ला करण्यात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरिद्वारहून परत येत असताना परविंदरच्या स्नायूंना दुखापत झाली म्हणून तो बर्फ घेण्यासाठी नोएडातल्या आईस फॅक्ट्रीमध्ये गेला. याचवेळी आईस फॅक्ट्रीमध्ये आणखी पाच जण आले. या पाच जणांचा फॅक्ट्रीमधील कर्मचाऱ्याबरोबर वाद झाला. या वादाचं रुपांतर मारहाणीमध्ये झालं. फॅक्ट्रीमध्ये आलेल्या त्या पाच जणांनी कर्मचाऱ्याला लाकडी दांडक्यानं मारहाण केली.


परविंदरनं हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर तो तिकडून निघून गेला. पण हायवेवरून जात असताना परविंदरनं त्या पाच जणांच्या ओव्हरटेक केलं. पण परविंदर पाठलाग करत असल्याचा समज त्या पाच जणांचा झाल्यामुळे त्यांनी परविंदरची गाडी अडवून त्याला मारहाण केली. यामध्ये परविंदरला किरकोळ दुखापत झाली आहे तर त्याच्या गाडीची काचही फुटली आहे.


याआधी २०१४मध्ये परविंदर अवानाला एका पोलिसानं मारहाण केली होती. परविंदरनं कार पार्किंगवरून ट्रॅफीक पोलिसाशी वाद घातला होता. यावेळी पोलिसानं परविंदरला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर त्या पोलिसाला निलंबित करण्यात आलं होतं.


परविंदर अवानानं २०१२मध्ये इंग्लंडविरुद्धच्या टी20मध्ये परविंदर अवानाची निवड करण्यात आली होती. २०१६मध्ये परविंदर अवाना आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळला होता. यंदाच्या वर्षी मात्र कोणत्याच फ्रॅन्चायजीनं अवानाला टीममध्ये घेतलं नाही. दिल्लीकडून परविंदर अवानानं ६२ फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आहेत.