Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय? थेट क्रीडामंत्र्याला केलं चीफ सिलेक्टर!
Wahab Riaz as Pakistan Chief Selector : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने वहाब रियाझची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे.
Pakistan Chief Selector : वर्ल्ड कपमध्ये झालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डामध्ये (PCB) खळबळ उडाल्याचं समोर आलं होतं. वर्ल्ड कपमधून सुपडा साफ झाल्यानंतर बाबर आझम (Babar Azam) कर्णधारपदावरून पायउतार झाला होता. त्यानंतर पाकिस्तानने दोन नव्या कर्णधारांची घोषणा केली होती. अशातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी खेळाडू आणि पाकिस्तानातील पंजाब राज्याचा क्रीडा मंत्री, वहाब रियाज (Wahab Riaz as Pakistan Chief Selector) याची पाकिस्तानचा मुख्य निवडकर्ता म्हणून नियुक्ती केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी राष्ट्रीय पुरुष संघाची निवड करण्याची जबाबदारी वहाब रियाझवर (Wahab Riaz) असणार आहे.
काय म्हणाला Wahab Riaz ?
राष्ट्रीय पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदाची भूमिका स्वीकारण्याचा मला सन्मान वाटतो आणि ही जबाबदारी माझ्यावर सोपवल्याबद्दल मी पीसीबी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री झका अश्रफ यांचे आभार मानतो. क्रिकेटच्या बाबतीत माजी खेळाडूंना सहभागी करून घेण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे आणि मी पाकिस्तान क्रिकेटच्या भल्यासाठी काम करण्यास तयार आहे, असं वहाब रियाझ याने म्हटलं आहे.
पाकिस्तान पुरुष संघाचे संचालक मोहम्मद हफीज यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आणि आम्ही पाकिस्तान क्रिकेटच्या यशासाठी जवळून काम करणार आहोत. देशांतर्गत क्रिकेटमधील अव्वल कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना महत्त्व देणे आणि आवश्यक कौशल्यांसह सुसज्ज संघांची घोषणा करणे हे माझे प्राथमिक ध्येय असेल, असंही वहाब रियाझ याने चीफ सिलेक्टरपदी नियुक्ती झाल्यानंतर म्हटलं आहे.
वहाब रियाझचं करियर
2008 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या वहाबने 27 कसोटी, 91 एकदिवसीय आणि 36 टी-20 सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करत 237 विकेट्स घेतल्या आणि तीन फॉरमॅटमध्ये 1200 धावा केल्या आहेत. आयसीसीच्या इवेंट्समध्ये 35 विकेट्स नोंदवणारा तो वर्ल्ड कपमधील पाकिस्तानचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज होता.