Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 वरुन भारत आणि पाकिस्तान (Ind vs Pak) पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे. भारतीय संघ काय निर्णय घेणार यावरुन पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची चिंता वाढली आहे. राजकीय संबंध ताणलेले असताना आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानचा दौरा करण्याची शक्यता फारच कमी आहे. यासंबंधी अंतिम निर्णय भारत सरकार घेणार असून सर्वांचं त्याकडे लक्ष लागलं आहे. जर भारताने पाकिस्तानचा दौरा केला नाही, तर आशिया कपप्रमाणेच हायब्रीड मॉडेलनुसार त्याचं आयोजन होऊ शकतं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या कोलंबोत आयसीसी बोर्डाची बैठक होणार आहे. या बैठकीत चॅम्पिअन्स ट्रॉफीसंबंधी अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो. यानंतरच खऱ्या अर्थाने चित्र स्पष्ट होईल. भारताने गतवर्षी आशिया कपमध्येही पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. यानंतर आशिया कप हायब्रीड मॉडेल अंतर्गत खेळवण्यात आला होता. जर भारत संघ पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफीत भारताचे सामने युएईमध्ये खेळवले जातील. 


पीसीबीच्या माजी प्रमुखांचं मोठं विधान


पीसीबीचे माजी प्रमुख खालिद महमूद यांनीही भारतीय संघ चॅम्पिअन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात येण्याची शक्यता फार कमी असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, "भारत पाकिस्तानात खेळण्यासाठी तयार होण्याची शक्यता फारच कमी आहे. भारत सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्डांपैकी असून त्यांचा फार दबदबा आहे. जर त्यांनी आपला संघ पाकिस्तानात पाठवला नाही तर श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेशसारखे संघ त्यांच्या मार्गावर जातील".


खालिद महमूद यांनी 1989 आणि 1999 अशा दोनवेळा पाकिस्तानचे ज्युनिअर आणि सिनिअर टीम मॅनेजर म्हणून भारताचा दौरा केला आहे. ते म्हणाले की, "भारत जर पाकिस्तानात आला नाही, तर चॅम्पिअन्स ट्रॉफीचं महत्त्व कमी होईल. त्याच्या आयोजनाचा खर्च वाढेल आणि नफा कमी होईल".


"या स्तरावर तुम्ही फक्त आपली बाजू ठामपणे मांडू शकता आणि इतर बोर्डाने आपल्या बाजूने आणण्यासाठी प्रयत्न करु शकता. भारताचा आयसीसीमध्ये फार दबदबा आहे. अशात पाकिस्तानला जशास तसं अशी भूमिका घेणं परवडणार नाही. जेव्हा बीसीसीआय म्हणतं की ते आपला संघ पाठवू शकत नाही आणि त्यांचे सामने पाकिस्तानबाहेर खेळेल, तेव्हा ते पाकिस्तानसाठी ICC कार्यक्रम आयोजित करण्याच्या उद्देशाला अपयशी ठरते," असंही ते म्हणाले आहेत.