Ind vs NZ: टीम इंडियाच्या पराभवानंतर नरेंद्र मोदी म्हणतात....
भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले.
नवी दिल्ली: विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात बुधवारी भारताला पराभवाचा सामना करावा लागला. न्यूझीलंडने भारतावर १८ धावांनी मात केली. या पराभवामुळे भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. यामुळे तमाम भारतीयांची मोठी निराशा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील याला अपवाद ठरले नाहीत.
या सामन्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट व्यक्त करून आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी म्हटले की, या सामन्याचा निकाल निराशाजनक आहे. मात्र, भारताने शेवटपर्यंत झुंज दिली हे पाहून खूप चांगले वाटले. संपूर्ण विश्वचषक स्पर्धेत भारताची फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण उत्तम होते. याचा आम्हाला अभिमान आहे. विजय आणि पराभव हा आयुष्याचा एक भाग असतो. भारतीय संघाला भविष्यासाठी शुभेच्छा, असे नरेंद्र मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर विजयासाठी २४० धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अत्यंत वाईट झाली. रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल आणि दिनेश कार्तिक झटपट बाद झाल्याने पहिल्या दहा षटकांमध्येच भारताची अवस्था ४ बाद २४ अशी केविलवाणी झाली होती. यानंतर ऋषभ पंत(३२) आणि हार्दिक पंड्या (३२) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. सँटनरच्या फिरकीवर मोठा फटका मारण्याच्या नादात पंत झेलबाद झाला.
यानंतर धोनीने एक बाजू लावून धरत भारताची पडझड थांबवली. त्याने रवींद्र जाडेजाच्या साथीने शतकी भागीदारी केली. जडेजाच्या फटकेबाजीमुळे भारताच्या विजयाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, शेवटच्या षटकांमध्ये हाणामारी करण्याच्या नादात जाडेजा आणि धोनी बाद झाले आणि भारताचा पराभव झाला. जाडेजाने ५९ चेंडूत ७७ धावांची खेळी साकारली. न्यूझीलंडकडून मॅट हेन्रीने १० षटकांमध्ये ३६ धावा देत तीन विकेट घेतल्या. त्याला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.