Mohammed Shami Heel Surgery : एखाद्या गोड स्वप्नासारखा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचे क्षण देऊन गेलेला वनडे वर्ल्ड कप, आजही प्रत्येकाच्या मनाला चटला लावून जातो. डोळे बंद करून वनडे वर्ल्ड कपमधील आठवणी उजागर केल्या की एक चेहरा हमखास समोर येतो, तो मोहम्मद शमी... आपल्या धारदार गोलंदाजीने विरोधी संघाच्या दांड्या मोडणाऱ्या शमीचं (Mohammed Shami) घातक मारा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरला. त्याच्या या उल्लेखनिय कामगिरीमुळे त्याला भारत सरकारतर्फे अर्जुन अवॉर्ड दिला होता. अशातच वर्ल्ड कपनंतर मोहम्मद शमीला सर्जरीला सामोरं जावं लागलं होतं. त्यावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी खास पोस्ट केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

घोट्याच्या दुखापतीने (Ankle Surgery) त्रस्त असलेल्या मोहम्मद शमीवर लंडनमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. वर्ल्ड कपपासून मोहम्मद शमी घोट्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होता. वर्ल्ड कपमध्ये देखील डॉक्टरांचे उपचार घेत तो खेळत होता. अशातच आता त्याची शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती त्याने स्वत: सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली आहे. 


काय म्हणाला मोहम्मद शमी?


माझ्या अकिलीस टेंडन टाचेची नुकतीच एक यशस्वी शस्त्रक्रिया झाली आहे. आता मला बरं होण्यासाठी थोडा वेळ लागेल, पण मी माझ्या पायावर उभा राहण्यासाठी उत्सुक आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता. शमीने बेडवरील काही पोस्ट करत प्रतिक्रिया दिली. त्यावेळी मोहम्मद शमीच्या चेहऱ्यावर तेज दिसत होतं. मोहम्मद शमीच्या या पोस्टवर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


पंतप्रधान काय म्हणाले?


मोहम्मद शमीच्या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रिपोस्ट केलं आणि शमीला शुभेच्छा दिल्या. तुला लवकरात लवकर बरं व्हावं आणि चांगलं आरोग्य मिळावं यासाठी शुभेच्छा, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मला विश्वास आहे की तुझ्यासाठी अविभाज्य असलेल्या या दुखापतीवर तू धैर्याने मात करशील, असा विश्वास देखील नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.


दरम्यान, टीम इंडियाचा फायनलमध्ये पराभव झाला, तेव्हा नरेंद्र मोदी यांनी ड्रेसिंग रुममध्ये जाऊन खेळाडूंची भेट घेतली होती. त्यावेळी मोहम्मद शमीची गळाभेट घेऊन, त्याचं सांत्वन मोदींनी केलं होतं. अशातच आता पुन्हा मोदींनी शमीसाठी खास पोस्ट केलीये. सर्जरीमुळे आता शमी आगामी आयपीएल खेळणार नाही, हे निश्चित झालंय. तर आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये शमी खेळणार का? असा सवाल आता विचारला जात आहे.