मुंबई : शरीरसौष्ठवपटूंच्या पीळदार शरीरयष्टीमागे खरी ताकद उभी असते ती त्यांच्या कुटुंबियांची... स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर खेळाडूंचा सन्मान होतो, त्यांचा सत्कारही केला जातो. मात्र आता बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकरांच्या संकल्पनेतून विजेत्या खेळाडूंच्या आई-बाबांचा, कुटुंबियांचाही सत्कार केला जाणार आहे. नुकत्याच झालेल्या अकराव्या भारत श्री स्पर्धेत महाराष्ट्राला 'सुवर्ण' जिंकून देणाऱ्या सुनीत जाधव, सागर कातुर्डे आणि नितीन म्हात्रे या मुंबईकर बाहुबलींचा गौरव सोहळा येत्या रविवारी 15 एप्रिलला गोरेगाव स्पोर्टस् क्लबमध्ये केला जाणार आहे. यासोबत या खेळाडूंच्या आई-बाबांचे तसेच मुंबई शरीरसौष्ठवाला सर्वात शक्तिशाली बनविण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या दिग्गज संघटक आणि कार्यकर्त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित केला जाणार असल्याची माहिती, संघटना अध्यक्ष आणि संयोजक  अजय खानविलकर यांनी दिली.


गौरव सोहळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या अकराव्या भारत श्री शरीरसौष्ठव स्पर्धेत सुनीत जाधवची जेतेपदाची हॅटट्रीक थोडक्यात हुकली. मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राने जी तिन्ही सुवर्णपदके जिंकली ती मुंबईकर बाहुबलींनीच जिंकून दिली. या पीळदार यशाबद्दल विजयी शरीरसौष्ठवपटूंचा सत्कार व्हावा. तसेच त्यांच्या डाएटसाठी प्रचंड मेहनत घेणाऱ्या त्यांच्या आई-बाबांचा, कुटुबियांचेही मनापासून आभार मानले जावे, यासाठी हा गौरव सोहळा आयोजित केला गेला आहे. यासाठी सर्व भारत श्री विजेत्यांसह त्यांच्या कुटुंबियांना आमंत्रित करण्यात आले आहे. एवढेच नव्हे तर मुंबईला भारतातील सर्वात शक्तिशाली जिल्हा शरीरसौष्ठव संघटना बनविण्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या भाई कदम, पपी पाटील, विकी गोरक्ष, आनंद गोसावी, मधुकर थोरात, श्याम रहाटे, अनिल राऊत आणि प्रवीण सकपाळ या दिग्गज खेळाडू-संघटकांचे सन्मान केले जाणार असल्याचे खानविलकरांनी सांगितले.


कार्यकर्त्यांचेही आभार 


यानिमित्ताने मुंबई शरीरसौष्ठव संघटनेची खरी ताकद असलेल्या कार्यकर्त्यांचाही प्रथमच कौतुक सोहळा केला जाणार आहे. आज देशभरात सर्वाधिक शरीरसौष्ठव स्पर्धा या मुंबईत होत आहेत. या दिमाखदार आयोजनाचे सारे श्रेय शरीरसौष्ठव संघटनेच्या मेहनती कार्यकर्त्यांचे आहे. त्यामुळे तब्बल 60 कार्यकर्त्यांना यावेळी सन्मानित करून त्यांचे आभार मानले जाणार असल्याची माहिती संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी दिली. या सोहळ्याला व्यायाममहर्षी मधुकरराव तळवलकर, भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे सर्वेसर्वा चेतन पाठारे, महाराष्ट्र शरीरसौष्ठवाचे चाणक्य अॅड. विक्रम रोठे, उपनगर संघटनेचे अध्यक्ष अमोल कीर्तीकर, ठाणे जिल्हा संघटनेचे प्रशांत आपटे यांची उपस्थिती लाभणार आहे.