हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच मॅचमध्ये पृथ्वी शॉनं शानदार शतक झळकावलं. या शतकामुळे शॉला मॅन ऑफ द मॅच देऊन गौरवण्यात आलं. या टेस्ट मॅचमध्ये भारताचा इनिंग आणि २७२ रननी विजय झाला. आता वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी टेस्ट शुक्रवारी १२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मॅचमध्ये पृथ्वी शॉनं शतक केलं तर तो दिग्गजांच्या यादीत जाऊन पोहोचणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी पहिल्या दोन्ही मॅचमध्ये शतक करण्याचं रेकॉर्ड सौरव गांगुली, मोहम्मद अजहरुद्दीन आणि रोहित शर्माच्या नावावर आहे. १९९६ साली इंग्लंडविरुद्ध गांगुलीनं हे रेकॉर्ड केलं होतं. तर अजहरुद्दीननं १९८४ साली पहिल्या दोन्ही मॅचमध्ये शतकं केली होती.


२०१३ साली रोहित शर्मानं वेस्ट इंडिजविरुद्धच हे रेकॉर्ड केलं होतं. रोहितनं कोलकात्याच्या त्याच्या पहिल्या टेस्टमध्ये आणि मुंबईच्या दुसऱ्या टेस्टमध्ये शतक केलं. मुंबईतली ही टेस्ट मॅच सचिनची शेवटची टेस्ट होती.


आपल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये शतक करणारा पृथ्वी शॉ सातवा सगळ्यात लहान खेळाडू आहे. पदार्पणाच्या सामन्यातच जलद शतक करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत शॉ तिसऱ्या क्रमांकावर आहे. शॉनं ९९ बॉलमध्ये शतक केलं होतं.