इंग्लंडमध्ये द्विशतक ठोकल्यानंतर पृथ्वी शॉची कॉलर टाइट, थेट BCCI शी भिडला; म्हणाला `आता तरी...`
Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ सध्या द्विशतक ठोकल्याने चर्चेत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील वन-डे कपमध्ये नॉर्थम्पटनशर संघातून खेळत आहे. येथे त्याने द्विशतक ठोकत भारतीय संघात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. दरम्यान, या खेळीनंतर त्याने भारतीय संघ निवडकर्त्यांवर भाष्य केलं आहे
Prithvi Shaw: भारतीय क्रिकेट संघाचा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) सध्या द्विशतक ठोकल्याने चर्चेत आहे. पृथ्वी शॉ सध्या इंग्लंडमधील वन-डे कपमध्ये नॉर्थम्पटनशर (Northamptonshire) संघातून खेळत आहे. येथे त्याने द्विशतक ठोकत भारतीय संघात पुनरागमन करण्याचे संकेत दिले आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत तीन सामनेच खेळले आहेत. तिसऱ्या सामन्यात पृथ्वी शॉने 153 चेंडूंमध्ये 244 धावांची जबरदस्त खेळी केली. दरम्यान, या खेळीनंतर त्याने भारतीय संघात जागा मिळत नसल्यासंबंधी भाष्य केलं.
पृथ्वी शॉने सध्या आपण राष्ट्रीय संघातील आपल्या भविष्याबद्दल विचार करत नसल्याचं म्हटलं आहे. सध्या आपण काऊंटी क्रिकेट खेळत असून, त्याचा आनंद घेऊ इच्छित आहोत असं पृथ्वी शॉने सांगितलं आहे. पृथ्वी शॉ जुलै 2021 मध्ये शेवटचा भारतीय संघासाठी खेळला होता. यानंतर रणजी ट्रॉफी आणि आयपीएलमध्येही तो खास कामगिरी करु शकला नव्हता. दरम्यान, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. याशिवाय क्रिकेटच्या मैदानाबाहेरील वादामुळेही पृथ्वी शॉ चर्चेत राहिला होता.
पहिल्यांदाच काऊंटी क्रिकेट खेळणाऱ्या 23 वर्षीय पृथ्वी शॉने 28 चौकार आणि 11 षटकार लगावत आपलं शतक पूर्ण केलं. ए लिस्टमधील हे त्याचं दुसरं शतक आहे. दरम्यान, पृथ्वी शॉला भारतीय संघात आपली जागा निर्माण करण्यासाठी बराच वेळ लागणार आहे. भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून या संघात पृथ्वी शॉला स्थान मिळालेलं नाही. याशिवाय आगामी आशिया कपमध्येही तो दिसणार नाही.
पृथ्वी शॉने द्विशतक ठोकल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने सांगितलं की, "मला येथे नक्कीच चांगला अनुभव मिळत आहे. भारतीय निवडकर्ते काय विचार करतील याचा मी खरंच विचार करत नाही. पण मला येथे चांगला वेळ घालवायचा आहे. नॉर्थम्पटनशरने मला ही संधी दिली असून, ते माझी चांगली काळजी घेत आहेत. मी खरंच आनंद घेत आहे".
"आज सूर्य तळपत होता. भारताप्रमाणे वातावरण असल्याने मला चांगलं वाटत होतं. मी काहीच विचार करत नव्हतो. जेव्हा इनसाइड एज लागूनही तुम्ही बाद होत नाही, तेव्हा तो दिवस तुमचा असतो. कधीतरी तुम्हाला नशीबाचीही साथ हवी असते. त्यामुळे हा दिवस माझा होता. मी त्यानंतर मागे वळून पाहिलं नाही. जेव्हा मी 150 धावा केल्या तेव्हा काहीतरी मोठं करण्याची संधी असल्याचं लक्षात आलं," असं पृथ्वी शॉने सांगितलं.
पृथ्वी शॉने भारतासाठी 5 कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 42.37 च्या सरासरीने आणि 86.04 च्या स्ट्राईक रेटने 339 धावा केल्या आहेत. त्याचवेळी, पृथ्वी शॉने 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये 31.50 च्या सरासरीने आणि 113.85 च्या स्ट्राइक रेटने 189 धावा केल्या आहेत. भारतीय संघासाठी त्याने एकच टी-20 आंतरराष्ट्रीय खेळला आहे, जिथे तो 0 धावांवर बाद झाला.