मुंबई: मैदानावरच्या नेमबाज अंजली भागवत या अपघातानं नेमबाज झाल्या. अभ्यासापेक्षा मुळातच खेळात  आवड असणाऱ्या अंजली यांनी आपल्या जबरदस्त
कामगिरीनं ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास यशस्वीपणे केला. सध्या त्या कोच म्हणून कार्यरत आहेत. 23 तारखेपासून सिडनी ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. भारत पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहे. त्याच निमित्तानं आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत यांच्यासोबत 'मराठी लिडर्स' या विशेष कार्यक्रमात 'झी 24 तास'चे संपादक निलेश खरे यांनी संवाद साधला.


कोरोना काळात खेळाडूंना सराव करण्यासाठी कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जगातल्या प्रत्येक खेळाडूंसाठी कोरोना काळातली परिस्थिती आव्हानात्मक होती. ऑलिम्पिक चॅम्पियन असो किंवा नवोदित खेळाडू असो. याकाळात सर्वजण एकाच नावेतून प्रवास करत आहोत. 


स्वत:ला फीट ठेवण्यासाठी योगा किंवा फ्री हॅण्ड सराव करायला हवा. हेल्थ चांगली असेल तर तुमची मानसिक स्थिती उत्तम राहाते. प्रत्यक्ष शुटिंग रेंजवर सराव करता येत नसल्याने व्हर्च्युअल सराव करण्यावर भर दिला गेला. आपण स्वत:मध्ये कसा आत्मविश्वास निर्माण करतो यावर खूप गोष्टी अवलंबून असतात.



यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये काय घडू शकतं?


नेमबाजीबाबत मी खूप सकारात्मक आहे. ऑलिम्पिक हा असा खेळ आहे जिथे तुम्ही आधी काहीच प्रेडिक्ट करू शकत नाही. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये आपली टीम खूप चांगली आहे. टीम म्हणून आपण नंबर वन आहोत. पूर्वी आम्ही जेव्हा जायचो तेव्हा आम्ही बाकी टीमना पाहायचो. पण आता भारताच्या टीमला पाहून घाबरतात अशी स्थिती आहे. त्यामुळे ही खूप सकारात्मक गोष्ट आहे.


ऑलिम्पिकची संधी कशी मिळाली?


माझं पहिलं ऑलिम्पिक 2000 साली सिडनीमध्ये होतं. जिथे मला वाईल्डकार्ड एन्ट्री मिळाली होती. त्याआधीची दोन वर्ष माझी कामगिरी चांगली असल्याने मला ऑलिम्पिकमध्ये संधी मिळाली.  त्याआधी मला वर्ल्डकपला मेडल मिळालं नव्हतं, कारण त्यावेळी तयारी थोडी कमी पडली. पण पहिली ऑलिम्पिकची स्पर्धा कधीच विसरता येणार नाही. त्यावेळी मी फायनलला पोहोचलेली पहिली महिला नेमबाज होते. ते सगळेच क्षण खूप अमूल्य होते. त्यानंतर अथेंन्स आणि बिजिंग ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची संधी मिळाली


करियर आणि कुटुंब सांभाळताना काय अडचणी आल्या?


कोणत्याही क्षेत्रात काम करताना कुटुंबाचा पाठिंबा हा खूप महत्त्वाचा भाग आहे. मला दोन्ही कुटुंबातून तेवढाच सपोर्ट मिळाला. तुम्हाला काही मिळवायचं असेल तर काहीतरी गमवावं लागतं. मी जेव्हा स्पर्धेसाठी परदेशात जायचे तेव्हा कुटुबियांच्या आठवणीने माझ्या डोळ्यात अश्रू यायचे. घरी माझी आठवण येत असेल, माझ्या मुलाला आठवण येत असेल पण ते काही क्षण व्हायचं. कारण जेव्हा आपण मैदानात नेमबाजीसाठी उभं राहतो तेव्हा बाकी सगळं विसरायला होतं. लक्ष फक्त आपल्या ध्येयाकडे आणि खेळाकडे असतं.


नेमबाजीच का निवडलं?


आमच्या घरात कोणी खेळाडू नाही. मला खेळाची खूप आवड होती. मी एनसीसीसाठी खास कीर्ती कॉलेजला अॅडमिशन घेतलं. ज्या मुलींची नेमबाजीसाठी निवड
झाली होती त्यावेळी अचानक त्यांच्या परीक्षा लागल्या. त्यामुळे मला आणि दिपालीला पाठवण्यात आलं. बघुया आपण असं म्हणत आम्ही तिथे गेलो. पहिल्या दिवशी मी ब्लँक टार्गेट घेऊन आले होते. त्यावेळी असं कधी वाटलंही नव्हतं की या क्षेत्रात आपण पुढे जाऊन काही करू शकतो. दुसऱ्या दिवशी आम्हाला पुन्हा जाव लागलं. त्यावेळी सरांनी मार्गदर्शन केलं. तिथून अहमदाबादला जाण्याची संधी मिळाली. अहमदाबादला मला पहिलं नॅशनल मेडल मिळालं आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.