कोलंबो : आपली ५० वे टेस्ट खेळणाऱ्या चेतेश्वर पुजारानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये खणखणीत शतक झळकावलं आहे. पुजाराचं हे टेस्ट क्रिकेटमधलं तेरावं शतक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शतकाबरोबरच पुजारानं दिग्गजांची रेकॉर्ड्स तोडली आहेत. सगळ्यात कमी टेस्ट इनिंगमध्ये १३ शतक झळकवणाऱ्या भारतीयांच्या यादीमध्ये पुजारा चौथा खेळाडू झाला आहे. पुजारानं ८४ टेस्ट इनिंगमध्ये १३ शतकं झळकावली आहेत. या यादीमध्ये ६८ इनिंगमध्ये १३ शतकं झळकावणारे सुनिल गावसकर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर विराट कोहली(८१) दुसऱ्या आणि सचिन तेंडुलकर(८४) तिसऱ्या क्रमांकावर आहे.


याचबरोबर टेस्ट क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद ४ हजार रन्स बनवणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये पुजारा चौथ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. पुजारानं ८४ इनिंगमध्ये ४ हजार रन्स केल्या. राहुल द्रविडनंही ८४ इनिंगमध्येच ४ हजार रन्सचा टप्पा ओलांडला होता. या यादीमध्ये वीरेंद्र सेहवाग पहिल्या क्रमांकावर आहे. सेहवागनं ७९ इनिंगमध्ये तर सुनिल गावसकर यांनी ८१ इनिंगमध्ये चार हजार रन्सचा टप्पा ओलांडला होता.


टेस्ट मॅचचं रेकॉर्ड पाहिलं तर गावसकर यांनी ४३ मॅचमध्ये तर सेहवाग आणि द्रविडनं ४८ मॅचमध्ये ४ हजार रन्स बनवल्या. पुजाराला चार हजार रन्स पूर्ण करायला ५० टेस्ट लागल्या.