पुलवामा हल्ल्याबद्दल सानिया मिर्झाचं ट्विट, नेटकरी संतापले
पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले.
मुंबई : पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट आहे. अनेक सेलिब्रिटी आणि खेळा़डूंनी सोशल नेटवर्किंगवरून या हल्ल्याचा निषेध केला आणि शहिदांना श्रद्धांजली वाहिली. पण सानिया मिर्झानं या हल्ल्याबद्दल कोणतंही वक्तव्य न केल्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर टीकेची झोड उठली. या सगळ्या टीकेनंतर सानिया मिर्झानं ट्विट केलं, पण या ट्विटमुळे तिला आणखी ट्रोल करण्यात आलं.
१४ फेब्रुवारीला जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर सानिया मिर्झाला लक्ष्य करण्यात आलं. सानियानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी लग्न केल्यामुळे तिच्यावर निशाणा साधण्यात आला.
या सगळ्या वादानंतर सानिया मिर्झानं एक मोठी पोस्ट ट्विट केली. पण या पोस्टमध्ये पाकिस्तानचा उल्लेख नसल्यामुळे यूजर्सनी सानिया मिर्झाला ट्रोल केलं. सानिया मिर्झा तिच्या ट्विटर पोस्टमध्ये म्हणाली 'ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर हल्ल्याचा निषेध केल्यानंतर, आमची देशभक्ती सिद्ध होईल का?. आम्ही सेलिब्रिटी आहोत आणि तुमच्यापैकी काही निराश लोकं दुसरीकडे स्वत:चा राग व्यक्त करू शकत नसल्यामुळे, द्वेष पसरवण्याची एकही संधी सोडत नाही का?'
'या हल्ल्याचा सार्वजनिकरित्या निषेध करण्याची किंवा आम्ही दहशतवादाच्या विरोधात आहोत हे गच्चीत उभं राहून ओरडण्याची आणि सोशल मीडियावर व्यक्त होण्याची गरज मला वाटत नाही. आम्ही जो कोणी दहशतवाद पसरवत असेल, त्याच्या विरोधात आहोत. डोकं ठिकाणावर असलेली प्रत्येक व्यक्ती ही दहशतवादाच्या विरोधात असते.'
'मी माझ्या देशासाठी खेळते आणि देशासाठी घाम गाळते. सीआरपीएफ जवानांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी मी उभी आहे. देशाचं संरक्षण करणारे तेच खरे हिरो आहेत. १४ फेब्रुवारी हा भारतासाठी काळा दिवस होता. यापुढे आम्हाला असा दिवस बघायला लागू नये. हा दिवस कधीच विसरला जाणार नाही आणि आपण विसरूही नये, पण मी शांततेचा आग्रह करते आणि तुम्हीही द्वेष पसरवण्यापेक्षा शांततेचाच आग्रह करा.'