IPL 2019 : अश्विनला डबल झटका, मॅच ही गमावली आणि १२ लाख ही
दिल्लीने केलेल्या पराभवामुळे पंजाबचा हा या पर्वातील ५ वा पराभव ठरला आहे.
दिल्ली : पंजाब विरुद्ध दिल्ली यांच्यात २० एप्रिलला झालेल्या मॅचमध्ये दिल्लीने पंजाबचा ५ विकेटने पराभव केला. पंजाबने विजयासाठी दिल्लीला १६४ रनचे आव्हान दिले होते. ते आव्हान दिल्लीने २ बॉलआधी पूर्ण केले. दिल्लीकडून सर्वाधिक ५८ रन श्रेयस अय्यरने केल्या. तर शिखर धवननेही ५६ रन करत दिल्लीच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली.
दिल्लीने केलेल्या पराभवामुळे पंजाबचा हा या पर्वातील ५ वा पराभव ठरला आहे. पराभवासोबतच पंजाबच्या अश्विनला डबल झटका लागला आहे. आश्विनने ठराविक वेळेपेक्षा २० ओव्हर टाकण्यासाठी अधिक वेळ घेतल्याने त्याला दंड ठोकण्यात आला आहे. मॅचदरम्यान २० ओव्हर पूर्ण करण्यासाठी वेळेचे बंधन असते. ही मर्यादा ओलांडल्यावर संबंधीत टीमच्या कॅप्टनला हा दंड ठोठावला जातो. अश्विनला ओव्हर स्पीड राखता न आल्याने १२ लाखांचा दंड भरावा लागणार आहे.
दरम्यान याआधी दिल्लीने टॉस जिंकून पंजाबला बॅटिंगसाठी आमंत्रित केले. पंजाबकडून ख्रिस गेलने सर्वाधिक ६९ रन केल्या. तर मनदीप सिंगने ३० रन करत चांगली साथ दिली. पंजाबने विकेट ठराविक अंतराने गमावल्यानंतर त्यांच्या एकाही जोडीला अर्धशतकी पार्टनरशीप करता आली नाही. दिल्लीकडून संदीप लमीछानेने सर्वाधिक ३ तर खगीसो रबाडा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.