राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर सेहवागवर भडकली प्रीती
आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान पंजाबची सह मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आणि संघाचा मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यात चांगलीच ट्युनिंग पाहायला मिळाली होती.
मुंबई : आयपीएलमध्ये खेळाडूंच्या लिलावादरम्यान पंजाबची सह मालकीण आणि अभिनेत्री प्रीती झिंटा आणि संघाचा मेंटर वीरेंद्र सेहवाग यांच्यात चांगलीच ट्युनिंग पाहायला मिळाली होती. मात्र मीडिया रिपोर्ट्स नुसार लिलावादरम्यान दिसलेल्या प्रीती-सेहवाग यांच्यात दरी निर्माण झाल्याचे दिसतेय. गेल्या चारपैकी तीन सामन्यात पंजाबला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही दरी इतकी वाढलीये की या सीझननंतर सेहवाग पंजाबची साथ सोडू शकतो.
मुंबई मिररच्या वृत्तानुसार मंगळवारी राजस्थानविरुद्धच्या पराभवानंतर चिडलेल्या प्रीतीने सेहवागला खरे खोटे सुनावले. ज्यानंतर सेहवाग या संघासोबत न राहण्याचा विचार करतोय. राजस्थानविरुद्धच्या सामन्यात पंजाबला विजयासाठी १५८ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र हे आव्हान पूर्ण करण्यातही पंजाबला अपयश आले. मिळालेल्या वृत्तानुसार पराभवानंतर प्रीती संघाच्या डगआउटमध्ये गेली आणि खेळाडूंसमोर सेहवागला पराभवासाठी जबाबदार ठरवत त्याच्या रणनीतीवर सवाल उपस्थित केले.
दरम्यान, प्रीती झिटांने ट्विट करुन हे वृत्त फेक असल्याचे म्हटलेय. इतकंच नव्हे तर तिने असंही म्हटलंय की, वृत्तपत्र तेव्हाच खरी न्यूज देते जेव्हा त्यांच्याकडे पेड आर्टिकल छापले जाते. माझे आणि वीरेंद्र यांच्यातील संवादाला वेगळेच रुप दिलेय.
का आला प्रीतीला राग
जेव्हा संघात करुण नायर आणि मनोज तिवारीसारखे फलंदाज असताना कर्णधार आर अश्विनला तिसऱ्या नंबरवर फलंदाजीसाठी का पाठवले गेले यामुळे प्रीतीला राग आला. या सामन्यात अश्विन शून्यावर बाद झाला.