आयपीएल २०१९ | चेन्नईचा विजयी चौकार, पंजाबचा २२ रनने पराभव
पंजाबची सुरुवात निराशाजनक राहिली.
चेन्नई : चेन्नईने विजयासाठी दिलेल्या १६१ रनचे पाठलाग करायला आलेल्या पंजाबचा २२ रनने पराभव झाला आहे. पंजाबला २० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून १३८ रन करता आल्या. पंजाबकडून सरफराज खानने सर्वाधिक ६७ तर लोकेश राहुलने ५५ रनची खेळी केली. या दोघांच्या अर्धशतकी खेळीनंतर देखील पंजाबला विजयी होता आले नाही.
पंजाबची सुरुवात निराशाजनक राहिली. पंजाबने आपले २ विकेट ७ रनच्या मोबदल्यात गमावले. विशेष म्हणजे पंजाबने पहिले २ विकेट हे डावातील दुसऱ्या ओव्हरमधील चौथ्या आणि शेवटच्या बॉलवर गमावले. विस्फोटक बॅट्समन क्रिस गेलला हरभजननने धोनीच्या हाती कॅचआऊट केले. गेल ५ रन करुन तंबूत परतला. यानंतर हरभजनने ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर मयांक अग्रवालला आऊट केले. मयांकला भोपळा देखील फोडता आला नाही.
मयांक आऊट झाल्यानंतर आलेल्या सरफराज खानच्या जोडीने सलामीवीर केएल राहुलने पंजाबचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ११७ रनची शतकी पार्टनरशिप केली. ही पार्टनरशिप तोडण्यास स्कॉट कुगेलिनला यश आले. त्याने लोकेश राहुलला ५५ रनवर आऊट केले. राहुल आऊट झाल्यानंतर मैदानात आलेल्या डेव्हिड मिलरला विशेष काही करता आले नाही. मिलर ६ रन करुन आऊट झाला.
चेन्नईकडून सर्वाधिक २ विकेट हरभजन आणि स्कॉट कुगेलिनने घेतल्या. तर दीपक चहरने १ विकेट घेत चांगली साथ दिली.
याआधी चेन्नईने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईची सुरुवात चांगली झाली. वॉटसन आणि फॅफ ड्यू प्लेसिसने पहिल्या विकेटसाठी ५६ रनची पार्टनरशीप केली. चेन्नईकडून सर्वाधिक ५४ रन फॅफ ड्यू प्लेसिसने केल्या. तर कॅप्टन धोनी आणि रायुडूने प्रत्येकी नॉटआऊट ३७ आणि २१ रन केल्या. या जोडीच्या खेळीच्या जोरावर चेन्नईला १६० रनचा टप्पा गाठता आला. पंजाबकडून आश्विनने विकेट घेतल्या. इतर कोणत्याही बॉलर विकेट घेण्याची कामगिरी करता आली नाही.