न्यूयॉर्क: स्पेनच्या राफेल नदालने रविवारी अमेरिकन खुल्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत रशियाच्या डॅनियल मेदवेदेव याचा पराभव करत विजेतेपदावर कब्जा केला. पाचव्या सेटपर्यंत रंगलेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेव याचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला. अमेरिकन ओपनचे विजेतेपद जिंकण्याची ही नदालची चौथी वेळ आहे. तसेच आता नदालच्या ग्रँडस्लॅम विजेतेपदांची संख्या १९ वर गेली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या सामन्यात सुरुवातीचे दोन सेट जिंकल्यामुळे नदाल हा सामना आरामात जिंकेल असे वाटत होते. मात्र, मेदवेदेवने निर्णायक क्षणी आपला खेळ उंचावत नदालला झुंजवले. त्यामुळे हा सामना पाचव्या सेटपर्यंत लांबला. 


तत्पूर्वी अमेरिकन ओपनमध्ये नोव्हाक जोकोव्हिच आणि रॉजर फेडरर या मातब्बर टेनिसपटूंचे आव्हान संपुष्टात आल्यानंतर नदालकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. नदालनेही उपांत्य फेरीत २४व्या मानांकित बेरेट्टिनीला ७-६ (८/६), ६-४, ६-१ असे नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. 



मेदवेदेव हा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा मरात सॅफिननंतरचा (२००५) पहिलाच रशियाचा पुरुष टेनिसपटू ठरला. यापूर्वी नदाल आणि मेदवेदेव एकदाच आमनेसामने आले होते. त्या सामन्यात नदालने मेदवेदेवचा धुव्वा उडवला होता. त्यामुळे अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्याविषयी क्रीडाप्रेमींना उत्सुकता होती. परंतु, मेदवेवेदवला नदालकडून पराभव स्वीकारावा लागला.