Rohit Sharma: टीम इंडिया विरूद्ध इंग्लंड यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्याला सुरूवात झाली आहे. यावेळी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माची प्रेस कॉन्फ्रेंस घेण्यात आली होती. यावेळी त्याने टेस्ट टीम इंडियामध्ये स्थान मिळत नसलेल्या अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्याबाबत वक्तव्य केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषद घेतली. यादरम्यान रोहितने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंची टेस्ट कारकीर्दीबाबत संकेत दिले. पत्रकार परिषदेत रोहित म्हणाला की, वरिष्ठ खेळाडूंबाबत चर्चा झाली, मात्र युवा खेळाडूंना संधी कधी दिली जाणार आहे हा देखील प्रश्न आहे.


भारताचा स्टार खेळाडू विराट कोहली पहिल्या दोन टेस्ट सामन्यांसाठी टीममध्ये नाहीये. अशा परिस्थितीत अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या जागी टीमचा कोणाचा समावेश करायचा यावर चर्चा केली. मात्र, रोहित शर्माने पत्रकार परिषदेत सांगितले की, कोहलीच्या जागी रजत पाटीदारचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे.


तरूण खेळाडूंना कधी मिळणार संधी


रोहित म्हणाला, आम्ही वरिष्ठ खेळाडूंच्या कमबॅकचा विचार केला होता, पण या युवा खेळाडूंना संधी कधी मिळणार? यावर आम्ही विचार केला. मी देखील या गोष्टीचा विचार केला. अनुभवी खेळाडूला बाहेर ठेवणं किंवा त्यांच्या नावाचा विचार न करणं हे फार कठीण आहे. त्यांनी किती रन केले आहेत, त्यांच्याकडे किती अनुभव आहे, आमच्यासाठी किती सामने जिंकले आहेत, या सगळ्याकडे दुर्लक्ष करणे फार कठीण आहे.


कोहलीच्या अनुपस्थितीवर काय म्हणाला रोहित?


रजत पाटीदारला संधी देण्यासंबंधी रोहित शर्माने भाष्य केलंय. पत्रकार परिषदेत त्याने यामागील हेतू स्पष्ट करताना सांगितलं की, "आम्ही विराट कोहलीच्या अनुपस्थितीत एखाद्या अनुभवी खेळाडूला संधी देण्याचा विचार केला. जर तरुण खेळाडूला संधी दिली तर थेट परदेशातील स्थितीत ते उघडे पडू नयेत अशी आशा असते. अनेकदा तेथील स्थितीची जाणीव असणाऱ्या काही खेळाडूंना संघात स्थान द्यावं लागतं.