प्रताप नाईक, कोल्हापूर : भारताची सुवर्ण कन्या नेमबाज राही सरनोबत आणि कबड्डी  विश्वचषक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या दीपिका जोसेफ यांना गेल्या दीड वर्षांपासून वेतन मिळालं नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यामुळे क्रीडा विश्वात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचं सरकार सुवर्ण पदक विजेत्या खेळाडुंच्या बाबतीत म्हणावं तितकं गंभीर नसल्याचं दिसून येतं आहे. कारण भारताची सुवर्णकन्या नेमबाज राही सरनोबत आणि दिपीका जोसेफ यांना तब्बल दीड वर्षापासून पगारच आदा करण्यात आलेला नाही. विशेष सन्मान म्हणून सरकारनं सुवर्ण कन्या राही सरनोबतची उपजिल्हाधीकारी पदावर नियुक्ती केली. राही सरनोबतला खेळांसाठी प्रोत्सहान मिळावं हा यामध्ये सरकारचा उद्देश होता. पण झालं उलटच.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुवर्ण कन्या राही सरनोबत हिची उपजिल्हाधीकारी म्हणून नेमणूक झाल्यापासून सप्टेंबर 2017 पर्यंत पगार मिळाला. त्यानंतर दीड वर्षे उलटून गेली तरी देखील राही सरनोबतला पगारच मिळालेला नाही. देशातील हरियाणा, पंजाब या राज्यात विशेष सन्मान म्हणून नियुक्त्या केलेल्या खेळाडुंबाबात धोरण तयार करण्यात आलं आहे. ज्यामुळं त्यांना कोणतीही अडचण येत नाही. पण महाराष्ट्रात मात्र धोरण नसल्याचा फटका खेळाडूंना बसतो आहे.


सरकारी काम बारा महिने थांब असा अनुभव सर्वसामान्य व्यक्तीला नित्याचाच आहे. पण हाच अनुभव सुवर्णपदक खेळाडूंच्या बाबतीत येत असेल तर नवे खेळाडू कसे तयार होणार असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आहे.