अजब योगायोग! पुजाराकडून द्रविडच्या तिसऱ्या रेकॉर्डशीही बरोबरी
भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे.
ऍडलेड : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या टेस्ट सीरिजला सुरुवात झाली आहे. ऍडलेडमध्ये सुरु असलेल्या पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला. दुसऱ्या ओव्हरमध्येच भारताची पहिली विकेट गेल्यानंतर पुजारा बॅटिंगला आला. २१व्या ओव्हरमध्येच भारतानं ४१ रनच्या स्कोअरवर पहिल्या ४ विकेट गमावल्या. पण पुजारा खेळपट्टीवर टिकून राहिला आणि त्यानं शानदार शतक झळकावलं.
एकीकडून विकेट जात असल्यामुळे सुरुवातीला पुजारानं सावध खेळ केला. २४६ बॉलमध्ये १२३ रन करून पुजारा आऊट झाला. पुजारानं ३८० मिनीटं बॅटिंग केली. ४१ रनवर ४ विकेट गेल्यानंतर पुजारानं रोहितबरोबर ४५ रनची पार्टनरशीप केली. यानंतर पुजारानं ऋषभ पंतसोबत ४१ रन, अश्विनसोबत ६२ रन, ईशांत शर्मासोबत २१ रन आणि मोहम्मद शमीसोबत ४० रनची पार्टनरशीप केली.
पुजारानं त्याच्या खेळीमध्ये १८० बॉलवर एकही रन काढली नाही. तर ३० वेळा १ रन, २२ वेळा २ रन, ३ वेळा ३ रन, ७ फोर आणि २ सिक्स मारले. ५० च्या स्ट्राईक रेटनं पुजारानं त्याची खेळी केली. पॅट कमिन्सच्या शानदार थ्रोवर पुजारा रन आऊट झाला. चेतेश्वर पुजाराचं टेस्ट क्रिकेटमधलं हे १६वं शतक होतं. शतक करायच्या आधी पुजारानं टेस्ट क्रिकेटमध्ये ५ हजार रनही पूर्ण केले.
द्रविडच्या तिसऱ्या रेकॉर्डशीही बरोबरी
योगायोगानं चेतेश्वर पुजारा आणि राहुल द्रविडच्या तीन रेकॉर्डमध्ये साम्य आहे. दोघांनी त्यांच्या ३ हजार रन ६७व्या इनिंगमध्ये, ४ हजार रन ८४व्या इनिंगमध्ये आणि ५ हजार रन १०८व्या इनिंगमध्ये पूर्ण केले. राहुल द्रविडप्रमाणेच चेतेश्वर पुजाराही तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येतो. आशिया खंडाच्या बाहेर पहिल्याच दिवशी टेस्टमध्ये शतक करणारा पुजारा हा सातवा भारतीय बॅट्समन बनला आहे.
पुजाराची विकेट गेल्यानंतर अंपायरनी दिवसाचा खेळ संपल्याचं घोषित केलं. दिवसाअखेरीस भारताचा स्कोअर २५० रनवर ९ विकेट असा होता. मोहम्मद शमी ६ रनवर नाबाद खेळत आहे. दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह बॅटिंगला उतरेल.