Rahul dravid आणि BCCI यांच्यात बिनसलं? झिम्बाब्वे दौऱ्यासाठी अचानक कोच बदलले
18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात आला होता. त्यानंतर आता कोचही बदलला आहे.
मुंबई : भारताचा झिम्बाब्वे दौरा सुरू होण्यास अवघा एक आठवडा बाकी आहे. मात्र अशातच एक मोठा बदल करण्यात आला आहे. 18 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या वनडे मालिकेसाठी टीमचा कर्णधार बदलण्यात आला होता. त्यानंतर आता कोचही बदलला आहे.
झिम्बाब्वेविरूद्धच्या सिरीजसाठी टीम इंडियाचे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड सोबत नसणार आहे. त्यांच्या जागी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण कोचपदाची भूमिका साकारणार आहे.
बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दिली. ते म्हणाले, व्हीव्हीएस लक्ष्मण झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय टीमचे प्रशिक्षक असतील. कारण आशिया चषक स्पर्धेसाठी वरिष्ठ टीम भारताला यूएईला जायचं आहे. त्यामुळे नियमित प्रशिक्षक राहुल द्रविड त्या टीमसोबत प्रवास करणार आहेत.
व्हीव्हीएस लक्ष्मण टीम इंडियासोबत अशाप्रकारे प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असल्याची ही पहिलीच वेळ नाही. अलीकडेच जेव्हा टीम इंडियाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयर्लंडचा दौरा केला तेव्हा व्हीव्हीएस लक्ष्मणही टीम इंडियासोबत गेला होता.
भारताला 18, 20 आणि 22 ऑगस्ट रोजी झिम्बाब्वेविरुद्ध वनडे सामने खेळायचे आहेत. आशिया चषक 27 ऑगस्टपासून सुरू होत असून टीम इंडियाला 23 ऑगस्टपर्यंत यूएईला पोहोचायचं आहे. म्हणजेच केएल राहुल, दीपक हुडा हे देखील आशिया चषकाच्या टीमचा भाग असलेले झिम्बाब्वेहून यूएईला पोहोचतील.