बंगळुरू : राहुल द्रविडच्या मुलानं वडिलांच्या पावलावर पाऊल टाकलं आहे. कर्नाटकच्या राज्यस्तरीय अंडर-१४ मॅचमध्ये राहुल द्रविडचा मुलगा समित द्रविडने द्विशतक केलं आहे. १४ वर्षांच्या समित द्रविडने उपाध्यक्ष-११ या टीमकडून खेळताना धारवाड झोनविरुद्ध २०१ रनची खेळी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२५६ बॉलमध्ये केलेल्या या खेळीमध्ये २२ फोरचा समावेश होता. द्विशतक केल्यानंतर समितने दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद ९४ रनही केले. बॉलिंग करताना समितने २६ रन देऊन ३ विकेट घेतल्या. अष्टपैलू कामगिरी केल्यानंतरही ही मॅच ड्रॉ झाली.


अंडर-१४ क्रिकेटमध्ये समितने याआधीही चांगली कामगिरी केली होती. २०१८ साली समितने माली आदिती आंतरराष्ट्रीय शाळेकडून खेळताना १५० रन केले. अंडर-१४ राज्यस्तरीय बीटीआर कपमध्ये समितने ही कामगिरी केली होती.


क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यावर ९ वर्षांचा असताना समितने २०१५ साली माली आदिती शाळेकडून खेळताना ७७ नाबाद, ९३ आणि ७७ अशा तीन अर्धशतकी खेळी केल्या होत्या. २०१६ साली समितने बंगळुरू युनायटेड क्लबकडून खेळताना १२५ रन केले होते. फ्रँक एन्थनी पब्लिक स्कूलविरुद्ध समितची ही खेळी होती.


राहुल द्रविडने १६४ टेस्ट मॅचमध्ये ५२.३ च्या सरासरीने १३,२८८ रन केले होते. तर वनडेमध्ये द्रविडने ३४४ मॅचमध्ये १०,८८९ रन केले, यामध्ये १२ शतकं आणि ८३ अर्धशतकांचा समावेश होता.