मुंबई : भारतीय महिला टीमची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि उपकर्णधार स्मृती मंधाना यांच्या समर्थनानंतर रमेश पोवार यांनी पुन्हा एकदा महिला क्रिकेट टीमचा प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे. रमेश पोवार यांचा महिला टीमसोबतची वादग्रस्त कारकिर्द ३० नोव्हेंबरला संपली. यानंतर पुन्हा एकदा त्यांनी प्रशिक्षक होण्यासाठी अर्ज केला आहे. स्मृती आणि हरमनप्रीतनं माझं समर्थन केल्यामुळे मी आज संध्याकाळी पुन्हा एकदा अर्ज केला आहे. मला त्या दोघींना निराश करायचं नव्हतं, अशी प्रतिक्रिया रमेश पोवार यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये इंग्लंडनं भारताचा पराभव केला. या मॅचमध्ये पोवार आणि हरमनप्रीतसह भारतीय टीम प्रशासनानं मिताली राजला डच्चू दिला होता. त्यामुळे मोठा वाद झाला होता.


वर्ल्ड कप संपल्यानंतर वेस्ट इंडिजवरून भारतात परतलेल्या मितालीनं पोवार आणि प्रशासकीय समितीच्या सदस्य डायना एडुलजी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. माझ्या कारकिर्दीचं नुकसान करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला. माझ्यासोबत या दोघांनी भेदभाव केल्याचं मिताली राज म्हणाली.


मिताली राजच्या या आरोपांना रमेश पोवार यांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. ओपनिंगला खेळवलं नाही तर मी टी-२० वर्ल्ड कपच्यामध्येच संन्यास घेईन, अशी धमकी मिताली राजनं दिला आणि टीमसमोर अडचण निर्माण केली, असा आरोप रमेश पोवार यांनी केला होता. या वादानंतर बीसीसीआयनं प्रशिक्षकपदासाठी पुन्हा अर्ज मागवले. १४ डिसेंबर ही अर्ज स्वीकारायची शेवटची तारीख आहे.


हरमनप्रीत आणि स्मृती मंधाना यांनी याआधीच रमेश पोवार यांच्या नावाला पसंती दर्शवली आहे. तर मिताली राजनं त्यांच्या पुनरागमनाला विरोध केला आहे.


भारताच्या पुरुषांच्या टीमसाठीच्या प्रशिक्षकांची निवड सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि सौरव गांगुलीची समिती करते. पण महिला टीमच्या प्रशिक्षकांची निवड करायला या तिघांच्या समितीनं नकार दिला होता. म्हणून बीसीसीआयनं नव्या समितीची नियुक्ती केली आहे. या समितीमध्ये माजी क्रिकेटपटू कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी यांचा समावेश करण्यात आला आहे.


या खेळाडूंचे अर्ज


रमेश पोवार यांच्याबरोबरच भारतीय महिला टीमच्या प्रशिक्षक पदासाठी मनोज प्रभाकर, दिमित्री मास्करेनहास यांनीही अर्ज केले आहेत.