नासाचे वैज्ञानिक रोनाल्डोचा डाएट प्लान तयार करतात; रमीज राझा यांचा अजब दावा; VIDEO व्हायरल
पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी खेळाडू रमीज राझा यांनी नासाचे वैज्ञानिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाएट प्लान आखतात असं अजब विधान केलं आहे. त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान संघ सेमी-फायनल गाठण्यात अपयशी ठरला असला तरी त्यांच्या माजी खेळाडूंनी केलेल्या अजब विधानांमुळे सतत चर्चेत होते. भारतीय गोलंदाजांना नवीन चेंडू दिला जात असल्याने तो स्विंग होतो इथपासून ते रोहित शर्मा जाणुनबुजून नाणं दूर फेकतो असे अजब दावे पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी करत खळबळ उडवून दिली. अशी बिनडोक विधान करण्यासाठी पाकिस्तानच्या माजी खेळाडूंमध्ये स्पर्धा लागलेली असतानाच आता रमीज राझा यांनीही यात आपल्या नावाचा समावेश केला आहे.
माजी खेळाडू आणि सध्याचे समालोचक रमीज राझा यांनी नासाचे वैज्ञानिक फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा डाएट प्लान आखतात असं अजब विधान केलं आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यानंतर रमीज राझा हे ट्रोलिंगचा विषय झाले आहेत. खेळाडूंच्या फिटनेसबद्दल बोलत असताना रमीझ राजा यांनी हे विधान केलं.
दरम्यान बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर शान मसूदची कसोटीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीकडे टी-20 कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, पीसीबीने एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार कोण असेल हे अद्याप जाहीर केलेलं नाही.
पीसीबीने आपल्या व्यवस्थापनातही फार बदल केले आहेत. वर्ल्डकप स्पर्धा सुरु असतानाच इंझमाम उल हकने राजीनामा दिल्यानंतर माजी वेगवान गोलंदाज वहाब रियाझची मुख्य निवडकर्ता म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय, पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू मोहम्मद हाफीजची पाकिस्तान पुरुष क्रिकेट संघाचा संघ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
ऑस्ट्रेलियाविरोधात तीन सामन्यांची कसोटी मालिका
त्याशिवाय, क्रिकेटपटू उमर गुल आणि सईद अजमल यांची पाकिस्तान पुरुष संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करून प्रशिक्षकाच्या भूमिकेतही बदल करण्यात आले आहेत. गुलची वेगवान गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर अजमल संघाचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक असेल.
संघात आणि व्यवस्थापनात इतके बदल केल्यानंतर पाकिस्तान संघ आता ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. 14 डिसेंबरपासून पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे.