रांची : भारत आणि ऑस्ट्रेलियातली तिसरी वनडे मॅच शुक्रवारी खेळवण्यात येणार आहे. रांचीच्या जेएससीए स्टेडियमवर हा सामना होईल. रांची हे एमएस धोनीचं घरचं मैदान आहे. ३७ वर्षांच्या धोनीनं या मैदानात एकूण ३ मॅच खेळल्या आहेत. शुक्रवारी धोनी इकडे चौथी मॅच खेळेल, पण धोनीची ही चौथी मॅच त्याच्या घरच्या मैदानातली शेवटची आंतरराष्ट्रीय मॅच असू शकते. याच कारणामुळे झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशननं धोनीच्या या शेवटच्या मॅचसाठी जोरदार तयारी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने रांचीच्या या मैदानात धोनीच्या नावाचं पॅव्हेलियन बनवलं आहे. आता या मॅचमध्ये धोनी फोर आणि सिक्सची बरसात करेल, अशी त्याच्या घरच्या चाहत्यांची अपेक्षा आहे.


एमएस धोनीनं त्याच्या १५ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४० वनडे खेळल्याआहेत. यातल्या फक्त ३ मॅच धोनीला घरच्या मैदानात खेळता आल्या. जगभरात विस्फोटक खेळी करणाऱ्या धोनीला घरच्या मैदानात मात्र आपली चमक दाखवता आली नाही. धोनीनं या मैदानात खेळलेल्या तीन मॅचपैकी एका मॅचमध्ये भारताचा विजय आणि दुसऱ्या मॅचमध्ये पराभव झाला. तर २०१३ साली ऑस्ट्रेलियाविरुद्धची मॅच रद्द करण्यात आली.


रांचीमध्ये धोनीची कामगिरी


रन विरुद्ध टीम निकाल वर्ष
१० नाबाद इंग्लंड भारताचा विजय २०१३
---  ऑस्ट्रेलिया सामना रद्द २०१३
११ रन न्यूझीलंड भारताचा पराभव २०१६

२००४ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या धोनीनं ४ वर्षांआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वर्ल्ड कपनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही संन्यास घेण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर रांचीमधली धोनीची ही शेवटची मॅच ठरेल. धोनीनं रांचीच्या या मैदानात फक्त २१ रन केल्या आहेत. त्यामुळे शुक्रवारी घरच्या मैदानात मोठी खेळी करण्याचा धोनीचा प्रयत्न असेल.


धोनीच्या घरच्या मैदानात कर्णधार विराट कोहलीची बॅट तळपली आहे. कोहलीनं ४ मॅचच्या ३ इनिंगमध्ये २६१ रन केले आहेत. कोहली या मैदानात सर्वाधिक रन करणारा खेळाडू आहे. कोहली वगळता श्रीलंकेच्या एंजलो मॅथ्यूजला या मैदानात १०० पेक्षा जास्त रन करता आल्या आहेत. कोहली आणि मॅथ्यूज या दोघांनीच या मैदानावर शतक केलं आहे.