हरारे : झिम्बाब्वेच्या हरारेमध्ये झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप क्वालिफायरच्या फायनलमध्ये अफगाणिस्तानच्या राशिद खाननं इतिहास घडवला आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १०० विकेट घेण्याचा रेकॉर्ड राशिद खाननं केला आहे. राशिदनं ऑस्ट्रेलियाचा फास्ट बॉलर मिचेल स्टार्कचं रेकॉर्ड मोडलं आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये राशिद खाननं एक विकेट घेऊन हे रेकॉर्ड केलं. राशिदनं ४४व्या वनडेमध्ये १०० विकेट घेतल्या आहेत. याआधी मिचेल स्टार्कनं ५२ मॅचमध्ये १०० विकेट घेतल्या होत्या.


सगळ्यात लहान वयात पहिल्या क्रमांकावर


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्या शानदार बॉलिंगच्या जोरावर राशिद खान वनडे क्रिकेटच्या क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकाचा बॉलर बनला आहे. भारताच्या जसप्रीत बुमराहसोबत राशिद पहिल्या क्रमांकावर आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये राशिदनं १६ विकेट घेतल्या होत्या.


एवढ्या लहान वयात पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला राशिद हा पहिला खेळाडू बनला आहे. राशिद खान १९ वर्ष १५२ दिवसांचा असताना वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला. याआधी पाकिस्तानचा बॉलर शकलेन मुश्ताकच्या नावावर हा रेकॉर्ड होता. शकलेन २१ वर्ष १३ दिवसांचा असताना वनडे क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचला होता.


सगळ्यात लहान वयात कॅप्टन


ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या राशिद खानला अफगाणिस्तानचा कॅप्टन बनवण्यात आलं आहे. असगर स्टानिकझईच्याऐवजी राशिद खानकडे ही जबाबदारी देण्यात आली. एवढ्या लहान वयामध्ये कोणत्याही फॉरमॅटचा कॅप्टन होण्याचं रेकॉर्डही राशिद खानच्या नावावर झालं आहे.