मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यामध्ये वाद असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. पण या चर्चा मुर्खपणाच्या असल्याचं टीम इंडियाचे प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले आहेत. टीममध्ये १५ खेळाडू असतात, त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं मत वेगळं असणं स्वाभाविक आहे, म्हणजे याला वाद म्हणता येणार नाही, असं शास्त्रींनी सांगितलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'मागच्या ५ वर्षांपासून मी टीमसोबत आहे. ते कसे खेळतात हे मला चांगलं माहिती आहे. जर त्यांच्यात खरच वाद असता तर रोहितने वर्ल्ड कपमध्ये ५ शतकं केली असती का?. या दोघांमध्ये पार्टनरशीप झाली असती का?' असे सवाल रवी शास्त्रींनी गल्फ न्यूजशी बोलताना विचारले.


ड्रेसिंग रुममध्ये प्रत्येक खेळाडू त्याचं मत मांडतो आणि नवीन कल्पना घेऊन येतो. टीममध्ये १५ खेळाडू असल्यामुळे वेगवेगळी मतं येतात आणि याची गरज आहे. प्रत्येकाने एकच मत मांडू नये, असं मला वाटतं. चर्चा केल्यामुळेच तुम्ही नवी रणनिती बनवू शकता, त्यामुळे आम्ही प्रत्येकाला बोलायची संधी देतो. यानंतर टीमसाठी जे सर्वोत्तम असेल, ती रणनिती आखतो, असं शास्त्री म्हणाले.


'या टीमला सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याची संधी आहे. ८० च्या दशकात वेस्ट इंडिजने आणि नंतर ऑस्ट्रेलियाने जसा दबदबा निर्माण केला तसंच ही भारतीय टीम करू शकते,' असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.