Ind vs NZ Virat Kohli: विराटने तिसरी ODI खेळू नये; शास्त्रींनी सांगितलं कारण
India Vs New Zealand ODI Series : मालिकेमध्ये भारताने 1-0 ने आघाडी मिळवली असून दुसरा सामना रायपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका खिशात घालण्याचा भारताचा मानस असेल. असं असतानाच शास्त्रींनी कोहलीसंदर्भात केलं विधान.
India Vs New Zealand ODI Series: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान (India Vs New Zealand) सध्या एकदिवसीय मालिका सुरु आहे. पहिल्या सामन्यामध्ये (India vs New Zealand 1st ODI) भारताने विजय मिळवत 1-0 ने आघाडी मिळवली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या इराद्याने रोहित शर्मा (Rohit Sharma) अॅण्ड कंपनी मैदानात उतरले. विराट कोहलीला (Virat Kohli) पहिल्या सामन्यात नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही. मात्र दुसऱ्या सामन्यामध्ये दमदार कमागिरी करण्याचा विराटचा मानस असेल. गवसेलेल्या फॉर्ममध्ये तुफान फलंदाजी करत भारतासाठी उर्वरित दोन्ही सामन्यात विजयश्री खेचून आणण्याचा विराटचा विचार असेल. मात्र भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्रींच्या (Ravi Shastri) डोक्यात विराटसंदर्भात एक वेगळाच प्लॅन आहे. विराट कोहलीने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेमध्ये खेळू नये असं मत शास्त्रींनी व्यक्त केलं आहे.
शास्त्रींनी दिला मोलाचा सल्ला
निवड समितीने (Selection Committee Of BCCI) विराट कोहली आणि रोहित शर्माला भारत आणि न्यूझीलंडदरम्यानच्या टी-20 (IND vs NZ T-20) मालिकेमधून डच्चू दिला आहे. तरुणांना संधी देण्याच्या धोरणानुसार हा निर्णय निवड समितीने (Selection Committee) घेतल्याचं समजतं. मात्र रवी शास्त्रींनी रायपुरमध्ये (Raipur ODI) होणाऱ्या एकदिवसीय सामन्यानंतरचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना विराटने खेळू नये असं म्हटलं आहे. शास्त्रींनी आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप (ICC Test Championship 2023) जिंकण्याच्या दृष्टीने हा सल्ला दिला आहे. त्यांनी या विजयासाठी विराटचं महत्त्व अधोरेखित करताना एक मोलाचा सल्ला दिला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका महत्त्वाची
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान फेब्रुवारी महिन्यात चार सामन्यांची टेस्ट सीरीज होणार आहे. बॉर्डर-गावस्कर टेस्ट सीरीज भारताला जिंकणं आवश्यक आहे. भारताने विजय मिळवला तरच टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये खेळण्याची संधी भारताला मिळणार आहे. जून महिन्यामध्ये इंग्लंडमध्ये टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना होणार आहे. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात आपलं स्थान जवळजवळ निश्चित केलं आहे. मात्र भारताचं स्थान अद्याप निश्चित झालेलं नाही. रोहित शर्माच्या नेतृ्वखालील संघाला दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेकडून कडवं आव्हान मिळत आहे. त्यामुळे दुसरं स्थान निश्चित करण्याच्या दृष्टीने भारतासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धची आगामी मालिका फार महत्त्वाची आहे.
...म्हणून शेवटचा सामना खेळू नये
ही गोष्ट लक्षात घेत शास्त्रींनी एक सल्ला दिला आहे. 24 जानेवारीपासून रणजी चषकाचे नव्या पर्वातील सामने खेळवले जाणार आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेआधी विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील सरावासाठी रणजी सामने खेळावेत असं शास्त्रींचं म्हणणं आहे. रवि शास्त्रींनी 'स्पोर्ट्सकीडा' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये, "जास्तीत जास्त प्रथम श्रेणी दर्जाचं क्रिकेट खेळलं पाहिजे. भारताला आगामी काळात मोठ्या प्रमाणात कसोटी सामने खेळायचे असल्याने हा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्यासाठी योग्य वेळ आहे. अव्वल स्थरावरील क्रिकेटपटू प्रथम श्रेणी क्रिकेट फारसं खेळत नाही असं मला वाटतं," असं मत व्यक्त केलं.
मोठं चित्र पहावं
तसेच, "सध्या मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. त्यामुळेच जास्त रिस्क घेणं योग्य नाही. सध्या खेळाडूंनी थोडं स्मार्टपणे वागणं गरजेचं आहे. काही सामने सोडून मोठ्या ध्येयाचा विचार केला पाहिजे. सध्या हे मोठं ध्येय ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका हे आहे," असंही शास्त्री म्हणाले.