मुंबई : रवी शास्त्री हे सध्या भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कपपर्यंत रवी शास्त्री हे भारतीय टीमचे प्रशिक्षक असतील. पण बीसीसीआयच्या नियमांनुसार प्रशिक्षकाच्या करारामध्ये मुदतवाढ करता येत नाही. त्यामुळे जरी बीसीसीआयला रवी शास्त्री यांनाच प्रशिक्षक म्हणून कायम ठेवण्याची इच्छा असली तरी त्यांना नव्या प्रशिक्षक निवडीची प्रक्रियाच राबवावी लागेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक फूटबॉल आणि एनबीएच्या क्लबमध्ये प्रशिक्षकांच्या करारामध्ये मुदतवाढीचा पर्याय असतो. पण बीसीसीआयने अनिल कुंबळे मुख्य प्रशिक्षक असल्यापासून हा पर्याय काढून टाकला. त्यामुळे आता रवी शास्त्री यांना पुन्हा प्रशिक्षक व्हायचं असेल, तर जुनी प्रक्रिया राबवावी लागेल. पण सध्या प्रशिक्षक असल्यामुळे त्यांना शॉर्टलिस्ट केलेल्या इच्छुकांमध्ये थेट प्रवेश मिळेल, असं बीसीसीआयमधल्या एका सूत्राने पीटीआयला सांगितलं.


प्रशिक्षकाच्या निवडीसाठी नेहमीप्रमाणे बीसीसीआयला जाहिरात देण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. ही जाहीरात बीसीसीआयच्या वेबसाईटवर दिली जाईल. रवी शास्त्री हे भारतीय टीमचे मुख्य प्रशिक्षक, संजय बांगर बॅटिंग प्रशिक्षक आणि भरत अरुण बॉलिंग प्रशिक्षक आहेत. वर्ल्ड कपमधली शेवटची मॅच संपल्यानंतर लगेचच त्यांचा करार संपेल.


वर्ल्ड कप संपल्यानंतर १४ दिवसांमध्ये टेस्ट चॅम्पयिनशीपला सुरुवात होणार आहे. यामध्ये भारताचा सामना वेस्ट इंडिजशी होणार आहे. ही सगळी प्रक्रिया कमी वेळेत करावी लागणार असली, तरी सगळ्या गोष्टी वर्ल्ड कप संपल्यानंतरच होतील, असं बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.


वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीम सेमी फायनलमध्ये पोहोचली तरी रवी शास्त्रींच्या पदाला धक्का लागणार नाही. कारण शास्त्री प्रशिक्षक असताना भारताने ऑस्ट्रेलियात पहिल्यांदाच टेस्ट सीरिज जिंकली. याचबरोबर वनडे सीरिजमध्ये भारताचा दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही विजय झाला, असं वक्तव्य बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने केलं.